मुंबई, पुणे, नागपूर, हिंगोलीत आंदोलनाला हिंसक वळण


14.20 पुणे : ठिय्या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर आंदोलनकर्त्यांची तोडफोड... पोलिसांची अतिरिक्‍त कुमक मागवली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

14.00 औरंगाबाद : आंदोलनाला वाळुंज भागात हिंसक वळण... आंदोलकांनी एका बसला आणि पोलिसांच्या एका गाडीला पेटवून दिलं


13.40 औरंगाबाद : शिवाजी नगर भागात आंदोलकांचं रेल्वे रुळांवर आंदोलन... ठिय्या आंदोलन सुरू असल्यानं रेल्वेसेवा विस्कळीत होण्याची शक्यता


3.30 पुणे : जिल्हाधिकाऱ्यांना मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने निवेदन सोपवलं... मागण्या पुढीलप्रमाणे...  


- मराठा समाजाला घटनात्मकदृष्टया वैध आरक्षण  


- राजर्षी छत्रपती शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी 


- डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता सुरु करावा 


- प्रत्येक जिल्ह्यात मराठा भवनासाठी शासकीय जमीन देण्यात यावी 


- मराठा कुणबी ओबीसी जात प्रमाणपत्र योजना लागू करावी


- छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था यासाठी निधी देण्यात यावा


- ईबीसी प्रवर्गातील यापूर्वी नोकरीत लागलेल्या उमेदवारांना शासकीय सेवेत कायम नोकरी देण्यात यावी 


- मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे


13.25 नाशिक : मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात संपूर्ण सिन्नर येथील शिवडे गावातील मराठा समाजाने ग्रामपंचायत इथं ठिय्या आंदोलन 


13.20 हिंगोली : सेनगावमध्ये चार चाकी गाडी जाळली... हायवे रोडवर एका ठेकेदारचं वाहन पेटवलं... आत्तापर्यंत दोन वाहन पेटवली, एका वाहनाची तोडफोड


13.10 लोणावळा : लोणावळ्यात आंदोलकांचा रेलरोको... संयोजकांच्या हस्तक्षेप आणि मध्यस्तीनंतर सुमारे तासाभराने आंदोलक लोणावळा रेल्वे स्थानकातून बाहेर पडण्यास सुरुवात


13.00 नागपूर : युवा आंदोलकांचं धाडस अंगाशी... रेल्वे रुळावर हायस्पीड ट्रेन येत असताना आंदोलकांनी रुळावर झोकून दिलं... घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी आंदोलकांना खेचत बाजूला केलं... १० आंदोलक पोलिसांच्या ताब्यात


12.40 लातूर : लातूरमध्ये हिंसक आंदोलन... बंदचं आवाहन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी औसा रोडवरच्या एका बंद धाब्यावर दगडफेक... तोडफोड करून ढाब्याचं मोठं नुकसान


12.30 लातूर : लातूर ग्रामीणचे काँग्रेस आमदार त्र्यंबक भिसे यांच्या गाडीवर आंदोलकांची दगडफेक... गाडीच्या काचा फोडल्या... रेणापूर फाटा इथं ही घटना घडली... 


12.25 लातूर : अहमदपूर इथं अग्निशमन दलाच्या वाहनावरही दगडफेक... हल्ल्यात दोन अधिकारी, वाहन चालक व चार फायरमन जखमी


12.10 अहमदनगर : नगर-मनमाड रोडवर पिंपरी निर्मळ आणि निमगाव निघोज इथं मराठा समाजाचा सकाळपासून रास्तो रोको आंदोलन सुरुच... रस्त्यावरच भात-आमटी शिजवून आंदोलक करणार भोजन 


12.00 हिंगोली : हिंगोली, परभणीत ठिकठिकाणी आंदोलनं... बैल-गाड्यां आंदोलकांची कुटुंबीयांसोबत रस्त्यावर भजन आंदोलनं... टायर पेटवून, झाड रस्त्यावर टाकून रास्तारोको... बाजारपेठा, शाळा-महाविद्यालय आणि पेट्रोलपंपही बंद


11.50 जालना : भोकरदन-सिल्लोड रस्त्यावर चक्का जाम... भोकरदनच्या शिवाजी महाराज चौकात चक्का जाम आंदोलन... दीड तासांपासून वाहतूक विस्कळीत


11.45 जळगाव : आंदोलक सुरेश मराठे यांचा आत्महत्येचा प्रयत्न... अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न... वेळीच हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला... मराठा क्रांती मोर्चाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन


11.30 जालना : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तीन तासांपासून चक्काजाम आंदोलन सुरु... शेकडो आंदोलकांनी वाहतूक रोखून धरली... आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त तैनात... वडीगोद्री इथंही चक्काजाम आंदोलन


11.20 पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन


11.10 मुंबई : वांद्रे पूर्व भागात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरू... तरुणी आणि महिलांकडे आंदोलनाचं नेतृत्व... मुंबईच्या कान-कोपऱ्यातून आंदोलक कार्यकर्ते मोठ्यासंख्येने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमा... सरकारविरोधात घोषणा


मुंबईतही आंदोलन

11.00 चांदवड : रिंगण सोहळा करीत सकल मराठा समाजानं मुंबई-आग्रा महामार्ग अडवला


10.57 अलिबाग : अलिबाग इथं मराठा मोर्चाला प्रारंभ, हजारो मराठा बांधव मोर्चात सहभागी... कान्होजी आंग्रे यांना अभिवादन करून मोर्चाला सुरुवात, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा


10.55 शिर्डी :   शिर्डीतील छत्रपती कॉम्प्लेक्स बंद... शिर्डीतील नगर - मनमाड महामार्गावरील हॉटेलही बंद... बस स्थानकावर शुकशुकाट


10.50 नांदेड : नांदेड - नागपूर महामार्गावर रास्ता रोको... नांदेड - हैद्राबाद महामार्गावरही वाहतूक रोखली... सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी 


10.45 लातूर : आंदोलनात माजी राज्यमंत्री आणि लातूरचे काँग्रेस आमदार अमित विलासराव देशमुख यांचाही सहभाग... मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी... लातूर-तुळजापूर महामार्गावर वासनगाव पाटी इथं ठिय्या आंदोलन 


10.40 मुंबई : मुंबईत तिन्ही मार्गावरची रेल्वे वाहतूक सुरळीत...  बेस्ट बस सेवा सुरळीत



10.30 नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मालेगावच्या टेहरे येथे रास्ता रोको सुरू... शेकडो आंदोलक रस्त्यावर... महिला आणि लहान मुलांचाही सहभाग


10.25 रायगड : मराठा क्रांती मोर्चा आंदोलनात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या... महाड इथं हजारो आंदोलनकर्ते महामार्गावर उतरले... दोन्ही बाजूकडील वाहतूक रोखली


10.20 नगर : राहात्यात नगर-मनमाड रोडवर टायर जाळत रास्ता रोको... नगर-ननमाड रोडवर राहुरी, पिंपरी निर्मळ, निमगाव निघोज इथंही रास्ता रोको सुरू... वाहतूक थांबली 


10.15 बीड : बीड जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खाजगी शाळा महाविद्यालये बंद... एसटी बंद असल्यानं प्रवाशांची तारांबळ, जिल्हाभरातून तब्बल एक हजार पेक्षा जास्त बस फेऱ्या रद्द


10.05 पंढरपूर : पंढरपूर शहर आणि तालुक्यात कडकडीत बंद... इंटरनेट सेवाही स्थगित... मंदिर परिसरात तुरळक गर्दी, शहरातील सर्व दुकाने बंद


10.00 बार्शी, सोलापूर : बार्शीमध्ये इंटरनेट सेवा बंद... सोशल मीडियामुळे तणाव वाढू नये यासाठी खबरदारी  


9.55 सोलापूर : मराठा संघटनांची बंदमधून माघार... फक्त चक्का जाम, मूक अंदोलन होणार


9.50 मालेगाव : मनमाड रोडवर कौळाणे इथंस सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको सुरु  


9.45 : सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग-दोडमार्गावर तहसीलदारांच्या गाडीला अज्ञाताकडून आग... सकल मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कृत्य 


9.40 यवतमाळ : यवतमाळमध्ये शाळा, महाविद्यालये, पेट्रोल पंप, एसटी बसेस, ऑटोरिक्षा, संपूर्ण बाजारपेठ बंद... आंदोलकांची शहरातून बाईक रॅली


9.30 पुणे : खबरदारी म्हणून पुणे जिल्ह्यातील शिरुर, खेड, बारामती, जुन्नर, मावळ, दौंड आणि भोर भागातील इंटरसेवा बंद


9.15 सांगली : सांगलीत बाजारपेठेत कडकडीत बंद... ठिय्या आंदोलन, रस्ता रोको आंदोलनाची आंदोलकांकडून आखणी 


9.12 पिंपरी चिंचवड : शहरातील सर्व बाजारपेठा बंद... शाळा-महाविद्यालय बंद... हिंजवडी भागातील बहुतांश आयटी कंपन्या बंद


9.10 धुळे : धुळ्यात शाळांना सुट्टी तर लांब पल्याच्या एसटी बस सेवा ठप्प... बंद शांततेत पार पडावा यासाठी जिल्ह्यात 1700 जणांचा पोलीस फौजफाटा तैनात... शिरपूर तालुक्यात मात्र बंद नाही... धुळ्यात जागर आंदोलन करण्यात येणार


9.10 नाशिक : नाशिकमध्ये सकल मराठा समाजाच्यावतीनं 'नाशिक बंद'ची हाक देण्यात आली नाही... मात्र डोंगरे वसतिगृह येथे ठिय्या आंदोलन... एसटी बंद मात्र शाळा सुरू... 


9.00 मुंबई : खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील काही शाळांचं 'मुलांना शाळेत पाठवू नका' असं पालकांना आवाहन... तरीही बहुतांशी शाळा सुरळीत सुरू 


8.50 जालना : जिल्ह्यात सकाळपासूनच दुकानं बंद... शाळा, महाविद्यालयांना सुट्टी 


8.40 लोणावळा : महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर आणि मावळ तालुक्यात कडकडीत बंद... रेल्वे स्टेशन, एसटी आगारात शुकशुकाट... एक्सप्रेस हायवेसह जुन्या मुंबई-पुणे हायवेवर तुरळक वाहतूक 


8.35 लातूर : महाराष्ट्र बंदचे आंदोलन जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच पेटलं... लातूर-बार्शी महामार्गावरील साखरा पाटी इथं टायर जाळून मध्यरात्रीपासूनच रास्ता रोकोला सुरुवात... आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी 


8.30 यवतमाळ : विदर्भ मराठवाडा सीमेवर मार्लेगावजवळ आंदोलकांनी रस्त्यावर टायर पेटवले... दगड, लाकडी फळ्या ठेऊन नागपूर - तुळजापूर राज्य मार्ग बंद


8.20 हिंगोली : हिंगोली जिल्हा बंदची हाक... मध्यरात्री सेनगाव येथे आंदोलनाला हिंसक वळण... अज्ञातांनी सेनगाव शहरातील तोष्णीवाल महाविद्यालयाच्या प्रांगणातील मिनी स्कूल बस पेटवली... पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी आग आटोक्यात आणली 


हिंगोलीत स्कूल बस पेटवली

8.15 सिंधुदुर्ग : आजच्या सकल मराठा समाज 'जेल भरो' आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात महाराष्ट्र परिवहन मंडळाकडून बस वाहतूक बंद... गोव्याच्या 'कदंबा' प्रशासनानंदेखील आपल्या सिंधुदुर्गातील वस्तीच्या बस गाड्या रात्रीच गोव्यात परत घेऊन येण्याचे चालकांना दिले आदेश


8.05 नंदुरबार : विश्व आदिवासी दिवसाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाचे कार्यक्रम लक्षात घेवून आजचा 'नंदुरबार बंद' पुढे ढकलण्याच निर्णय मराठा समाजाच्या समन्वयकांचा निर्णय 


8.00 पालघर : आजच्या 'आदिवासी क्रांती दिवसा'निमित्तानं पालघर जिल्हात आज सकल मराठा समाजाचा बंद मागे


7.50 अलिबाग : अलिबाग आगारातून एकही बस सुटली नाही किंवा आली नाही... काही शाळांनी केली सुट्टी जाहीर केलीय मात्र काही शाळा सुरू असल्या तरी विद्यार्थ्याची मात्र तुरळक उपस्थिती


7.40 नागपूर : मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदमुळे नागपूरमधील खाजगी शाळांना सुट्टी जाहीर


7.30 मुंबई : मुंबईतील शाळा सुरु, नवी मुंबईतील शाळांना सुट्टी


7.15 लातूर  लातूरमध्ये मराठा आंदोलकांनी मध्यरात्री केला रस्ता रोको; आंदोलकांनी रोखला लातूर-बार्शी-पुणे रस्ता


7.03 मुंबई : एसटी प्रशासनाकडून मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला आगार बंद


7.02 नवी मुंबई : नवी मुंबईचे एपीएमसी मार्केट बंद राहणार... खाजगी शाळा बंद आहेत, पण महापालिका शाळा सुरू 


7.01 पुणे : लोणावळा, धुळे, यवतमाळ, अकोला, पुणे, बीड, जालन्यात शाळा बंद


7.00 पंढरपूर : पंढरपूरमध्ये इंटरनेट सेवा खंडीत


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पेटलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुन्हा एकदा आंदोलकांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यापूर्वी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने बंद आंदोलन करण्यात आले होते. मात्र, यावेळी पहिल्यांदाच मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमधून ठाणे आणि नवी मुंबईतील मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांनी माघार घेतली आहे. मात्र, यापूर्वी बंद आंदोलनादरम्यान दोन्ही ठिकाणी झालेला हिंसाचार पाहता, आज ही दोन्ही शहरं शांत राहणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


दरम्यान, आजच्या बंद आंदोलनाला सुरुवात झाली असून राज्याच्या विविध भागांमध्ये त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, लोणावळा, धुळे, यवतमाळ, अकोला, पुणे, बीड आणि जालना शहरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर पंढपूरमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेटसेवा खंडित करण्यात आली आहे. तर या आंदोलनाचे केंद्र ठरु शकणाऱ्या मुंबईतही एसटी सेवा जवळपास ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. यापूर्वीच्या आंदोलनादरम्यान एसटी बसेसना लक्ष्य करण्यात आले होते. त्यामुळे एसटी प्रशासनाने नेहरुनगर, परळ आणि मुंबई सेंट्रल हे तिन्ही डेपो बंद ठेवले आहेत.