कडक सॅल्यूट! पोलिसांनी 1 लाख 72 हजार रुपये असलेली बॅग 3 तासात शोधली
पोलिसांनी अवघ्या 3 तासांमध्ये 1 लाख 72 हजार रुपये असलेली बॅग शोधली.
बीड : चोरटे डल्ला टाकताना गरीब-श्रीमंत भेदभाव करत नाहीत. चोरटे संधी मिेळेल तिथे हात साफ करतात. काही चोरट्यांनी मंदिराबाहेरील भिकाऱ्याची पैशाने भरलेली बॅग लंपास केली. हा सर्व प्रकार बीडमधील परळी वैजनाथ मंदिराबाहेर घडला. घटना 25 मे रोजीची आहे. भिकाऱ्याच्या बॅगेत जवळपास तब्बल 1 लाख 75 हजारांचा मुद्देमाल होता. त्या भिकाऱ्याने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पुढील 3 तासात पोलिसांनी त्या भिकाऱ्याला त्याची बॅग परत मिळवून दिली. त्यामुळे बीड पोलिसांचं कौतुक केलं जात आहे. (maharashtra beed parli police fonds beggar's lost bag found 1 lakh 72 thousand 290 ruppes cash in 3 hours)
नक्की काय घडलं?
बाबुराव नाईकवाडे हे गेल्या अनेक वर्षांपासून परळी वैजनाथ मंदिराबाहेर भिक्षा मागतात. बाबुराव यांनी वर्षोंनवर्ष भिक मागून मोठी रक्कम जमा केली. पण सोमवारी 25 मे रोजी बाबुराव यांची ही पैशांची बॅग चोरटयांनी लंपास केली. बॅग चोरी झाल्याचं समजताच बाबुराव यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली. "माझी पैशांनी भरलेली बॅग चोरी झाली आहे. त्यात दीड लाखांपेक्षा अधिक रक्कम आहे, असं भिकारी बाबुरावने सांगितलं. मात्र, पोलिसांना सुरुवातीला विश्वास बसला नाही. पण बाबुराव पोलिसांसमोर गयावया करु लागले. त्यानंतर पोलिसांनी गांभीर्याने चौकशी केली. पोलिसांनी बॅगेचा तपास सुरु केला.
शोध सुरु करताच अवघ्या 3 तासांमध्ये पोलिसांनी ती बॅग शोधून काढली. पैशांनी भरलेली बॅग पोलिसांना रामनगरमधील टांडा परिसरात मिळाली. यानंतर पोलिसांनी पंचांच्या मध्यस्थीने त्या भिकाऱ्याला 1 लाख 72 हजार 290 रुपये सपुर्त केले. आयुष्यभर जमा केलेली रक्कम पोलिसांमुळे भिकाऱ्याला मिळाली. दरम्यान, इतकी मोठी रक्कम सोबत न बाळगता बॅंकेत ठेवण्याचा सल्ला बीड पोलिसांनी बाबुराव यांना दिला आहे.