Maharashtra Bhushan Puraskar 2023 :  ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने (Maharashtra Bhushan Puraskar 2023) सन्मानित करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते धर्माधिकारी यांना गौरवण्यात आलं. नवी मुंबईतील खारघर येथील मैदानात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमला तुफान गर्दी झाली होती. भर दुपारी हा कार्यक्रम पार पडला.  महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानंतर उन्हाच्या तडाख्यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला आहे.  24 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.  15 जण अत्यावस्थ असल्याची माहिती देखील समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ मंत्री या सोहळ्याला उपस्थित होते. पुरस्कारातला 25 लाखांचा निधी आप्पासाहेब धर्माधिकारींनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला.  ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सत्कार सोहळ्यासाठी कानाकोपऱ्यातून नागरीक खारघरमध्ये दाखल झाले होते. मैदान गर्दीने भरले होते. कडक उन्हामुळे अनेकांची प्रकृती बिघडली. अनेकांना चक्कर तसेचत ग्लानी आली.  


500 जणांची प्रकृती बिघडली


महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा खारघर येथील मैदानावर संपन्न झाला. हा कार्यक्रम संपल्यानंतर  लोकांना अस्वस्थ वाटू लागले. जवळपास 500 जणांना याचा त्रास झाल्याचे समजते. अनेकांना कळंबोली येथील  एमजीएम रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कळंबोली येथील एमजीएम रुग्णालय दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री अधिकारी आणि डॉक्टरांकडून याबाबत माहिती घेत आहेत. मंत्री दीपक केसरकर स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर हे देखील एमजीएम रुग्णालायत पोहचले आहेत. यासह अनेकांना वाशी येथील नवी मुंबई महानगर पालिका रुग्णालय, नेरुळ येथील डी वाय पाटील रुग्णालय तसेच खारघर येथील टाटा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे. 15 जण अत्यावस्थ असल्याची माहिती देखील समोर आली आहे. 


काय घडलं नेमकं?


खारघर येथील मैदानावर हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.  महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर उपस्थितांपैकी काहींना उष्माघाताचा त्रास झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर अतिउष्णतेमुळे काही नागरीक आजारी पडले. उन्हाचा तडाखा बसल्यानं काही नागरिकांना चक्कर आली. सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. राज्यात सध्या  पारा 40 अंश सेल्सियसच्या वर आहे. त्यातच उन्हाच्या ताडख्यात नागरीक मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी आले होते.  



सात ते आठ जणांचा मृत्यू


उष्माघातामुळे सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी  सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मृतांच्या नातेवाईका मदत केली जाणार आहे. तसेच उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.