पंकजा मुंडे यांचा पराभव समर्थकांच्या जिव्हारी, चार जणांनी उचचलं टोकाचं पाऊल...कोण होते ते?
Pankaja Munde : भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. हा पराभव त्यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला. आतापर्यंत बीडमध्ये चार जणांनी आत्महत्या केल्या आहेत. पंकजा मुंडे निवडून येतील त्यांना चांगलं पद मिळेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती.
विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : बीड लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा दारून पराभव केला. पंकजा मुंडे यांचा पराभव त्यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला. पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि समर्थकांमध्ये त्या दिवशी पासूनच अस्वस्थता पाहायला मिळाली आणि या अस्वस्थतेतूनच पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी आपलं जीवन संपायला सुरुवात केली बीड लोकसभा मतदारसंघात (Beed Loksabha Constituency) पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर बीड जिल्ह्यात आत्महत्यांची सत्र सुरू आहे.
पंकजा मुंडे यांचं आवाहन
यातील चिंचेवाडी इथल्या वायबसे कुटुंबाला पंकजा मुंडे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनाही अश्रू अनावर झाले. यावेळी पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना आता आत्महत्या करू नका तर मला लढण्यासाठी बळ द्या असे समर्थकांना आवाहन केलं. आत्महत्या थांबल्या नाही तर मी राजकारण सोडून देईल असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले असून आगामी शंभर दिवसात हे सगळे चित्र बदलून टाकू असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. मी एवढी भावनिक कधीही होत नाही, माझे अश्रू डोळ्यांच्या कडा बाहेर येत नाहीत. पण या घटनेने मी भावनिक झाले आहे मला स्वतःला या घटनांनी अपराधीपणाची भावना निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांनी एवढ्या टोकाचा निर्णय घेऊ नये. मला अजून लढायचे त्या लढाईसाठी तुमची बळ तुमचं बळ आवश्यक आहे. ते बळ मला तुमच्याकडून हवं आहे, अशा घटनांतून काहीही साध्य होणार नाही असे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे
आत्महत्या करणारे कोण?
पंकजा मुंडे यांच्या बीड लोकसभा मतदारसंघातील पराभवानंतर अंबाजोगाई तालुक्यातील डिगोळ आंबा इथल्या युवकांनी आत्महत्या केली होती. चिंचेवाडी इथल्या पांडुरंग सोनावणे यांनी देखील गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करताना पंकजा मुंडे यांना अश्रू अनावर झाले. त्यांची मुलगी जेव्हा पंकजा मुंडे यांच्या गळ्यात पडून रडू लागली तेव्हा पंकजा मुंडे यांनीही आपल्या भावना अनावर झाल्या. कार्यकर्त्यांनी असे पाऊल उचलू नये अन्यथा मी राजकारण सोडून देईल असा आता असे प्रकार थांबवा आणि मला बळ द्या अशी भावनिक साद देखील पंकजा मुंडे यांनी समर्थकांना घातली आहे.
आत्महत्येंचा घटनाक्रम
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर इथल्या सचिन मुंडे यांन आत्महत्या केल्याची घटना निकालाच्या काही तासानंतर घडली. त्यानंतर आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी इथल्या पोपट वायबसे या तरुणांना आत्महत्या केली. तर आत्महत्या केलेल्या नातेवाईकांना आष्टी इथं भेटण्यासाठी पंकजा मुंडे ज्यावेळेस आल्या त्यावेळी शिरूर तालुक्यातील वारणी इथल्या गणेश बडे या तरुणांना आत्महत्या केली. पंकजा मुंडे यांनी शिरूर इथल्या वारणी इथं गणेश बडे यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहिल्या. यावेळी बडे यांच्या कुटुंबाचा आक्रोश एकूण उपस्थित नेत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.