Maharashtra Cabinet Expansion :  मंत्रिपद न मिळाल्यानं शिवसेनेत नाराजांची फौज उभी राहिलीय. विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे आणि नरेंद्र भोडेंकरांनी जाहीर नाराजी व्यक्त केलीय. केसरकर आणि सत्तार यांनीही आपली नाराजी लपवून ठेवलेली नाही. ही नाराजी एकनाथ शिंदेंसाठी डोकेदुखी ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेत नाराजीचं पीक आलंय. मंत्रिपद न मिळाल्यानं शिवसेनेतील मातब्बरांनी शिवसेना नेतृत्वावर जाहीर नाराजी व्यक्त केलीय. फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळात संधी मिळाली नसल्यानं अनेक आमदार नाराज झालेत. शिवसेनेतील नाराजी उफाळून आलीये. काल आमदार प्रकाश सुर्वे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्यासह आदिवासी आमदार राजेंद्र गावित, आमदार नरेंद्र भोंडेकर हे सुद्धा नाराज असल्याची माहिती आहे.
अशी नाराजांची मोठी रांग आहे. नरेंद्र भोंडेकरांनी उपनेतेपद आणि विभागीय समन्वयपदाचा राजीनामा दिलाय. शिवसेनेत पुढं-पुढं करणाऱ्यांना मंत्रिपदं दिल्याचा आरोप भोंडेकरांनी केलाय. 


विजय शिवतारेंनीही मंत्रिपद न मिळाल्यानं जाहीर नाराजी व्यक्त केलीय. नाराजीमुळं त्यांनी तर थेट पुरंदरचा रस्ता धरलाय. तानाजी सावंतांनी तर मौनव्रत धारण केलंय. तब्येत खराब असल्याचा खलिताच त्यांनी माध्यमांना धाडलाय. शिवसेनेचे 6 आमदार आदिवासी आहेत पण त्यापैकी एकहीजण मंत्रिमंडळात का नाही असा सवाल राजेंद्र गावितांनी पक्षनेतृत्वाला विचारलाय. प्रकाश सुर्वेंचा नाराजी लपवताना चेहरा रडवेला झाला होता.


दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार यांचा सुतकी चेहरा मनात काय आहे हे सांगण्यासाठी पुरेसा आहे.  नाराजांची संख्या जास्त आहे. पण ही नाराजी त्याच्या पुढं जाणार नाही असं शिवसेना नेतृत्वाला वाटत असावं. त्यामुळं या नाराजांची नाराजी फक्त धुसफुशीपर्यंतच मर्यादित राहणार असं सांगण्यात येतंय.