सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Shivsena Thackeray Group) नाशिक जिल्ह्यात काही फेरफार केले आहेत. यात सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांना जिल्हाप्रमुख पद देण्यात आले. याची घोषणा काही दिवसांपूर्वी मातोश्रीवरून करण्यात आली. यानंतर डिसेंबर महिन्यापासून सुरु असलेल्या सलीम कुत्ता याच्या पार्टी प्रकरणी सुधाकर बडगुजर यांच्यावर बेकायदेशीर कृत्य केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे नव्याने पदाची सूत्र हाती घेतलेल्या बडगुजर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे प्रकरण?
मुंबई येथे 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटात (Mumbai 1993 Blast) सलीम कुत्ता (Salim Kutta) आरोपी आहे. सध्या सलीम कुत्ता पुण्याच्या येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे. यादरम्यान 2016 मध्ये सलीम कुत्ता नाशिकरोड कारागृहात शिक्षा भोगत होता. मे महिन्यात तो पॅरोल रजेवर बाहेर पडला. पॅरोल रजा संपण्याच्या आदल्या रात्री नाशिकच्या आडगाव येथील फार्महाऊसवरील पार्टीत सहभागी झाला. या पार्टीत सुधाकर बडगुजर सुद्धा सहभागी होते. या पार्टीमध्ये बडगुजर आणि सलिम कुत्ता हे दोघे 'मै हू डॉन...' या गाण्यावर नाचत होते. हा व्हिडिओ आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात दाखवून लक्षवेधी मांडली होती.  


'एसआयटी' चौकशीची घोषणा
बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर हे एकत्र डान्स करत असल्याचा व्हिडीओ भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दाखवला होता. या व्हिडीओमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. याची चौकशी करण्याची मागणी यावेळी राणेंनी केली होती. यानंतर विधानसभेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची 'एसआयटी' चौकशीची घोषणा केली होती. यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 'एसआयटी' चौकशीच्या घोषणे नंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. यानंतर बडगुजर यांना विशेष गुन्हे शाखेमध्ये पाचारण करण्यात आले. गेल्या दोन महिन्यापासून त्यांची विशेष गुन्हे शाखा आणि लाचलुचपत विभागाकडून सातत्त्याने समांतर चौकशी केली गेली. मात्र काहीही निष्पन्न झाले नव्हते. त्यानंतर अचानक गुन्हा दाखल केल्याने प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. 


राजकीय सूडभावनेतून गुन्हा
गुन्हा दाखल झाल्यानंतर  सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी राजकीय  सूडभावनेतून हा गुन्हा दाखल झाला आसल्याचा आरोप केला आहे. सलीम कुत्ता याच्या कार्यक्रमाला इतर 20 ते 22 जण सुद्धा होते या लोकांवर का गुन्हे दाखल झाले नाही ? असा सवाल सुद्धा यावेळी त्यांनी उपस्थित केला. 'आम्ही केल तर पाप त्यांनी केल ते पुण्य' अशी भूमिका सत्ताधारी पक्षाची असल्याच त्यांनी म्हटलं आहे. पोलिसांवर प्रशासन आणि सत्ताधारी यांनी दबाव आणून गुन्हा दाखल केल्याचा आरोप सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.