Eknath Shinde on Aditya Thackeray: ठाण्यातील युवासेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आज जनक्षोभ यात्रा काढत सरकारवर निशाणा साधला. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी या सभेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आपण ठाण्यातून निवडणूक लढत जिंकून दाखवू असं जाहीर आव्हान दिलं. दरम्यान आदित्य ठाकरे तसंच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"शिवसेना मोठी करण्यासाठी माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं. तुमचा तेव्हा जन्मही झाला नव्हता. घरावर तुळशीपत्र ठेवलं होतं, म्हणूनच शिवसेना इतकी मोठी झाली. त्यामुळे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या आणि आयत्या पीठावर रेघोटे ओढणाऱ्यांबद्दल मी काय बोलणार? मला त्यांच्यावर बोलण्याची गरज वाटत नाही," असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. 


"ठाण्यात फार अस्वस्थता दिसत असल्याचं मी कालही पाहिलं. त्यांनी सर्व मर्यादा सोडल्या आहेत. सत्ता गेल्यावर काय परिस्थिती होते हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. मला गुंडमंत्री आणि फडणवीसांनी फडतूस गृहमंत्री म्हणाले. ज्यांच्या काळात इतके मोठे कांड झाले, दोन मंत्री जेलमध्ये गेले, गृहखात्याचे धिंडवडे काढले, विरोधात बोलणाऱ्यांना जेलात टाकलं, नारायण राणेंना जेवणावरुन उठवलं, कंगनाचं घर तोडलं, केतकी चितळेला जेलमध्ये टाकलं, नवनीत राणा आणि रवी राणा यांना जेलात टाकलं. ही केलेली गुंडागर्दी ते विसरले का? तेव्हा ते मुख्यमंत्री होते. आम्ही असं काही केलं नाही," असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं. 


"आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार असल्याने मर्यादा सोडणार नाही. पण काल जे मी पाहिलं ते दुर्दैवी आहे. फडणवीसांनी खूप संयम बाळगला. ते उद्धट किंवा उद्ध्वस्त ठाकरे म्हणाले नाहीत. ही संस्कृती, परंपरा आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत. सत्तेच्या खुर्चीसाठी सगळा खेळ सुरु आहे. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सरु असून ती मिळणार नाही. मी योग्य वेळी उत्तर देईन. आम्हालाही तिखट बोलता येतं. पण आम्ही मर्यादा पाळतो," असं यावेळी ते म्हणाले. 


"बोलणाऱ्यांचं कर्तृत्व काय आहे. बाळासाहेबांची पुण्याई, नाव सोडलं तर तुमच्याकडे काय आहे? महाराष्ट्रात जनता कामाला महत्त्व देते, आऱोपांना नाही. मी सर्व आरोपांना योग्य वेळी उत्तर देईन," असा इशारा यावेळी त्यांनी दिला.