अजित पवारांना सत्तेत सहभागी करताना विश्वासात घेतलं का? शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले `फडणवीस आणि इतर वरिष्ठ...`
Maharashtra Political Crisis: अजित पवारांना (Ajit Pawar) सत्तेत सहभागी करुन घेतल्याने शिंदे गट (Shinde Faction) नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले आहेत.
Maharashtra Political Crisis: अजित पवारांना (Ajit Pawar) सत्तेत सहभागी करुन घेतल्याने शिंदे गट (Shinde Faction) नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ANI ला दिलेल्या मुलाखतीत, एकनाथ शिंदे यांनी विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले आहेत. अजित पवारांना जेव्हा युतीत घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी, देवेंद्र फडणवीस आणि इतर वरिष्ठांनी विश्वासात घेऊन निर्णय घेतला अशी माहिती दिली.
"सरकार बनवाताना आम्ही बाळासाहेबांची विचारधारा, हिंदुत्व यांना पुढे घेऊन जात आहोत. विकासाशी या सर्व गोष्टी जोडत आहोत. इतका विकास झाला आहे की, अजित पवारांनीही तो मान्य केला आहे. अजित पवार विकासालाच साथ देत आहेत. अजित पवारांचेही तेच विचार असून त्यासाठीच ते एकत्र आले आहेत. यापुढे अजून मजबूतीने काम होईल," असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. ते म्हणाले "त्यांच्या पक्षाची जी स्थिती आहे ती पाहिली पाहिजे. आत्मचिंतन करायला हवं. दुसऱ्याचं घऱ पाहण्यापेक्षा आपलं घर शाबूत आहे का ते पाहायला हवं. माझी काल आमदार, खासदारांसोबत बैठक झाली. आमच्या सरकारचा शपथविधी झाल्यापासून हे सरकार जाणार असं बोललं जात आहे. पण हे सरकार मजूबत होत चाललं आहे".
"तिन्ही पक्षांचे मिळून सदस्य 200 च्या पुढे गेले आहेत. आम्हाला केंद्र सरकार, पंतप्रधानांचा पाठिंबा आहे. गृहमंत्रीही यात लक्ष्य घालतात. आमच्या प्रस्तावाला तात्काळ मान्यता दिली जाते. डबल इंजिन सरकार वेगाने काम करत असल्याने यांच्या पोटात दुखत आहे," अशी टीका त्यांनी केली.
"आम्ही सत्ता सोडली होती. पुढे काय होणार हे आम्हाला माहिती नव्हतं. पण एक विचारधारा, भूमिका घेत आम्ही सत्तेतून बाहेर पडलो होतो. आम्हाला खुर्चीची लालसा नाही. आमच्या आमदारांनी पुढे काय होईल याचीही पर्वा केली नव्हती. अजित पवार आणि सहकारी आल्याने सरकार मजबूत झालं आहे. अजून वेगाने विकास होईल. हे सर्वसामान्यांच्या भल्यासाठी सरकार आहे. मी पण सर्वसामान्य आहे. शेतकऱ्याचा मुलगा आहे," असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
"राज्यात इतक्या वेगाने काम होत आहे. देशातील पहिल्या क्रमांकाच्या पायाभूत सुविधा येथे मिळत आहेत. मी आणि देवेंद्र यांनी सरकार बनवलं तेव्हा पहिल्या क्रमांकावर आलो. आता विकासाच्या मुद्दयावर आणि मोदींच्या नेतृत्वाच्या माध्यमातून अजित पवार आमच्यासह आले असून त्यांचं स्वागत आहे", असंही ते म्हणाले.
ठाकरे गटाने काही नाराज नेते आमच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे. त्यासंबंधी बोलताना एकनाथ शिंदेंनी सांगितलं की, "आमच्याकडे 200 पेक्षा जास्त आमदार आहेत. येथे इतके मजबूत सरकार आहे. जे संपर्कात आहेत त्यांची नावं सांगावीत. आम्ही गुवाहाटीत असल्यापासून असे दावे करत आहे. आमदारांची मतदारक्षेत्रात काम करण्याची आणि त्यांनी न्याय देण्याची भूमिका आहे".
"2024 लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात होईल. महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक जागा येतील. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत आम्ही ऐतिहासिक कामगिरी करु. यामुळेच ते घाबरले आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काही समस्या येणार नाही. आमदारांच्या जागा कायम असतील. उर्वरित जागा वाटून घेऊ," असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.