लैलेश बारगजे / अहमदनगर : बँकेतले अनेक घोटाळे आपण ऐकले आहेत मात्र तुम्ही कधी चिल्लर घोटाळ्याबद्दल ऐकलं नसेल. अहमनगरच्या नगर अर्बन बँकेत घोटाळा झालाय तोही तब्बल अडीच कोटी रूपयांचा. काय आहे हा चिल्लर घोटाला ? तुम्हीच पाहा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहनगरमधील अर्बन बँक वेगवेगळ्या घोटाळ्यांमुळे चर्चेत आहे, सध्या बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलीय. मात्र घोटाळ्यांची मालिका संपायला तयार नाही. आता 2017 चं एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. आशिष लांडगे नावाच्या व्यक्तीनं बँकेत तब्बल अडीच कोटींच्या चिल्लरचा भरणा केला. त्यानंतर काही दिवसातच त्या व्यक्तीला तीन कोटींचं कर्ज मंजूर करण्यात आलं. मात्र खरा घोटाळा यापुढे आहे. लांडगे यांनी बँकेत भरलेली चिल्लर नेमकी कुठे गायब झाली याचा थांगपत्ताच लागत नाही.


एवढी मोठी रक्कम बँकेत भरतेवेळी नेमके कोणते अधिकारी उपस्थित होते? ती चिल्लर कुठे ठेवण्यात आली? याबाबत बँकेच्या व्यवस्थापकांकडे विचारणा केली असता..प्रशासकांकडे बोट दाखवण्यात आले आहे. या घोटाळ्याप्रकरणी तब्बल तीन वर्षांनी म्हणजे डिसेंबर 2020 मध्ये शाखा व्यवस्थापकांनी गुन्हा दाखल केला. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेनं संचालक मंडळासह आशुतोष लांडगेंसह काही कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.



बँकेचे पैसे वापरण्यासाठी संचालक मंडळ आणि कर्मचारी वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात. ब-याचदा त्यांना व्यापा-यांचीही साथ असते. आता चिल्लरच्या माध्यमातून सामान्यांच्या पैशांवर कुणी डल्ला मारला याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.