दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्याच्या राजकीय पटलावर गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आता आणखी एका घडामोडीचीही भर पडताना दिसत आहे. कारण, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदलांची सुरुवात झाली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकिकडे महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार अशी चर्चा सुरु असतानाच बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील 9 जिल्हाध्यक्ष बदलण्याचा अखिल भारतीय काँग्रेस समितीकडे पाठवलेला प्रस्ताव काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंजुर केला आहे. 


थोरातांचा हा प्रस्ताव मंजुर केल्यानं राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेला पूर्वविराम मिळण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष बदलाला सुरुवात झाल्यानं प्रदेशाध्क्षपद त्यांच्याकडेच राहणार हे स्पष्ट झालं आहे.


विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रदेशाध्यक्ष होण्यासंबंधी इच्छा व्यक्त केली होती. दिल्ली दरबारी त्यांनी ही मागणी केल्याचं कळलं होतं. तेव्हापासून महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष बदलला जाईल अशी चर्चा सुरु झाली होती. अखेर बाळासाहेब थोरात यांनी संघटनात्मक बदलांचा प्रस्ताव सोनिया गांधी यांना पाठवला होता. या प्रस्तावाला गांधींकडून स्वीकृती मिळाल्यामुळं आता प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरातच कायम असतील हे स्पष्ट होत आहे. 



दरम्यान, थोरातांच्या प्रस्तावाला मिळेली मान्यता पाहता पक्षात संघटनात्मक बदलांना सुरुवात झाली आहे, यामुळे थोरात यांचं पद आणखी भक्कम झाल्याची चर्चा काँग्रेसमध्ये आहे. 



नव्याने नियुक्त झालेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष


लातूर जिल्हाध्यक्ष- श्रीशैल मल्लिकार्जुन उटगे


लातूर शहराध्यक्ष- ऍड. किरण जाधव 


औरंगाबाद जिल्हाध्यक्ष- डॉ. कल्याण काळे


औरंगाबाद शहराध्यक्ष- मोहम्मद हिशाम उस्मानी 


ठाणे शहराध्यक्ष- ऍड. विक्रांत चव्हाण 


भंडारा जिल्हाध्यक्ष- मोहन विठ्ठलराव पंचभाई 


गोंदिया जिल्हाध्यक्ष- नामदेव दसाराम किरसान 


चंद्रपूर जिल्हाध्यक्ष- रितेश सत्यनारायण तिवारी 


चंद्रपूर शहराध्यक्ष- प्रकाश मारोतराव देवतळे