मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा आघाडीचं सरकार येणार असा विश्वास नवनिर्वाचत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी आता बाळासाहेब थोरात यांची नेमणूक करण्यात आली आहे.  माझ्यावर मोठी जबाबदारी आहे, आणि या जबाबदारीत मी यशस्वी होणार असल्याचे त्यांनी म्हटले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीला कशाप्रकारे सामोरं जायचं याची चिंता पक्षाला होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात पक्षाला नवसंजीवनी देणं, पक्ष सोडून जाणार्‍या आमदारांना थोपवणं, विधानसभा निवडणुकीची तयारी करणं, मित्र पक्षांबरोबर जागा वाटपाबाबत चर्चा करणे अशी जबाबदारी नव्या प्रदेशाध्यक्षांना पार पाडावी लागणार होती. विधानसभा निवडणुकीला तीन महिने शिल्लक असताना नवा प्रदेशाध्यक्ष ही जबाबदारी कशी पार पाडणार हा प्रश्न होताच. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी विखे-पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्य़ातीलच बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करताना काँग्रेसने त्यांच्या जोडीला पाच कार्याध्यक्षांची नियुक्ती केली आहे. विभागवार या नियुक्त्या करण्यात आल्या असून त्यामुळे विधानसभा निवडणुकीची जबाबदारीचे वाटपही त्या पद्धतीने केले जाण्याची शक्यता आहे.


राज्यभरात नियुक्त्या



पूर्व विदर्भातून नितीन राऊत, पश्चिम विदर्भातून यशोमती ठाकूर, मराठवाड्यातून बसवराज पाटील, पश्चिम महाराष्ट्रातून विश्वजित कदम, तर
कोकण, ठाणे, मुंबईतून मुझफ्फर हुसेन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी उत्तर महाराष्ट्रातील के. सी. पडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्या करताना ज्येष्ठ आणि तरुणांचा समतोलही साधण्यात आलाय. आता काँग्रेसची ही नवी टीम विधानसभा निवडणुकीत कशी कामगिरी करणार याबाबत उत्सुकता आहे.