राज्यात कोरोनाचे १२,६०८ नवे रुग्ण; ३६४ जणांचा मृत्यू
राज्यात १० लाख ३२ हजार १०५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबई: राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १२,६०८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर उपचार सुरु असलेल्या ३६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाखाच्या पुढे गेली आहे. राज्यातील करोना मृतांचा वाढणारा आकडा चिंताजनक आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे एकूण १९,४२७ जणांचा बळी गेला आहे. राज्यात एकीकडे रुग्ण बरे होण्याचा दर वाढत असताना मृत्यूदर मात्र स्थिर आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३० लाख ४५ हजार ८५ नमुन्यांपैकी ५ लाख ७२ हजार ७३४ नमुने पॉझिटिव्ह (१८.८ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ३२ हजार १०५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ३८६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
आज नोंद झालेल्या एकूण ३६४ मृत्यूंपैकी २७७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४१ मृत्यू ठाणे जिल्हा –१६, सांगली -७, पुणे -६, रायगड -३, बीड -२, कोल्हापूर -१, नागपूर -१, रत्नागिरी -१ सोलापूर – १, जळगाव -१, लातूर -१ आणि नाशिक -१असे आहेत.