Maharashtra Dairy Farmers Protest :  राज्यातील गाय दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ निर्माण झाली आहे. काही दिवसापूर्वी 33 रुपये असणारा दुधाचा दर दूध संघानी 30 आणि 29 रुपये लिटरने दूध खरेदी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नफा तरी सोडा पण मुद्दल देखील निघत नसल्याची तक्रार गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांची आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे गावातील 54 वर्षीय ज्योतीराम विष्णू घोडके. गेल्या 35 वर्षांपासून गाय दूध उत्पादनाचा व्यवसाय करत आहेत. घोडके आता कर्जाच्या सापळ्यात अडकू लागलेत. कारण दुधाच्या जोडधंद्यातून त्यांना फायद्याऐवजी तोटा होऊ लागलाय. काही दिवसापूर्वी गाईच्या दुधाला 33 रुपये दर होता त्याच बरोबर शासनाकडून देखील लिटर मागे 7 रुपये अनुदान मिळत होत. पण आता दूध संघानी अतिरिक्त दुधाच्या उत्पादनाचे कारण देऊन कुठे 30 रुपये तर कुठे 28 रुपये लिटर दूध खरेदी करायला सुरुवात केलीय. त्यात शासनाचा दर प्रति लिटर 28 असल्यामुळं दूध संघांना कोणाचीच भीती राहिलेली नाही


सरकारने अनुदानाचं गाजर दाखवलं पण एक दोन हप्ते वगळता दूध उत्पादकांच्या हाती भोपळा दिला. पशुखाद्याचे वाढलेले दर आणि गायीच्या दुधाला मिळणारा दर याचा ताळमेळ कुठंच बसत नाही. त्यामुळे नफा तर सोडाच पण मुद्दल देखील निघताना दिसत नाही.


पशुखाद्याचे दर पाहता गाय दुधाला कमीत कमी 40 रुपये लिटर दर मिळाला पाहिजे. पण प्रत्यक्षात गाय दूध उत्पादकाला 28 रुपये ते 30 रुपये इतका दर मिळतोय. हा तोटा असाच सुरु राहिल्यास दुग्धव्यवसाय कायमचा निकाली निघेल अशी भीती व्यक्त केली जातेय.