Maharashtra Assembly Election 2024: ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. त्यानंतर भाजपचे नेते आक्रमक झालेत. नोमानी यांच्या आवाहनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नोमानींच्या आवाहनानंतर राज्यातील प्रचारात जोरदार घमासान पाहायला मिळतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवेंद्र फडणवीसांच्या ट्विटने खळबळ


ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे  प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी विधानसभा निवडणुकीत संघटनेची भूमिका जाहिर केल्यानंतर राज्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. नोमानींच्या आवाहनानंतर भाजपचे नेते आक्रमक झालेत. हिंदू मतांच्या एकत्रिकारणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या महत्त्वपूर्ण नेत्यांनी बटेंगे तो कटेंगेचा नारा देत या विरोधात मोर्चा उघडला आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 'यही समय हैं, सही समय हैं, सोए हुए को जगाने का' असं त्यांनी ट्विट केलं आहे. 


नोमानी यांच्यावर कारवाईची मागणी


दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नोमानी यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आणत नोमानी व्होट जिहाद करत असल्याची तक्रार केलीय. त्यांनी निवडणुक आयोगाला पत्र पाठवत नोमानी यांच्यावर कारवाईची मागणी केलीय.  तर शुक्रवारी पुण्यातील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट नोमानी यांची एक ऑडिओक्लीप थेट व्यासपीठावरून जनतेला ऐकवली आहे. 


व्होट जिहादच्या टीकेला राऊतांकडून प्रत्युत्तर


 भाजप नेत्यांच्या व्होट जिहादच्या टीकेला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ज्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे की, जे कांदा उत्पादक होते त्यांनी आम्हाला मदत नाही केली त्यांना कादा जिहाद म्हणणार का? असा सवाल त्यांनी केला. तर देवेंद्र फडणवीस काय म्हणतात हे धर्मयुद्ध आहे. महाराष्ट्र धर्म हा महाराष्ट्र वाचवण्यासाठी आणि राखण्यासाठी हे आमचे धर्मयुद्ध आहे. असं संजय राऊत म्हणाले. 


एकंदरीतच नोमानी यांच्या आवाहनानंतर राज्यात भाजप आणि मविआच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झालेत. प्रचाराला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे हे घमासान आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.