बुलढाणा : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याबाबत विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून चारा छावण्या सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. परंतु प्रशासनाकडून अद्याप एकाही गावात चारा छावणी सुरू करण्यात न आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.  तुटपुंजे अनुदान, जाचक अटी शर्तींमुळे छावण्या चालवणे कठीण होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने जाचक अटी शिथिल करून तत्काळ जिल्ह्यात चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. या मागणीसाठी आज शेगाव शहरात काँग्रेसने रस्ता रोको आंदोलन केले.


काँग्रेसच्या मागण्या 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्ह्यात प्रचंड दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पाण्याचा, चार्‍याचा आणि पशुधन वाचवण्याचा मोठा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे. राज्य सरकारने 25 जानेवारी रोजी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याचा अध्यादेश जारी केला मात्र अद्यापपर्यंत एकही छावणी सुरु झालेली नाही. ती तात्काळ सुरु व्हावी, पाणी टंचाई असलेल्या गावात टँकरने पाणी पुरवठा व्हावा आणि शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज वाटप करण्यात यावे अशा मागण्या काँग्रेसने ठेवल्या.


65 जण ताब्यात 



या मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाचे नेते रामविजय बुरुंगले यांच्या नेतृत्वात तालुका आणि शहर काँग्रेसच्या वतीने शेगाव शहरातील शिवाजी चौकात खामगाव -अकोट राज्यमार्गावर रस्ता रोको करण्यात आले.  याचा वाहतूकीवर परिणाम झाला. दरम्यान ठाणेदार सुनील हूड यांनी रास्तारोको करण्याऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी 65 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध कारवाई केली आहे.