गोविंद तुपे, झी मीडिया, शहापूर : तळ गाठलेल्या विहिरी, त्यात चहुबाजूंनी पडलेले दोर, दोरीला बांधलेले डबे वर खेचण्याचा चाललेला आटापिटा. हे चित्र मराठवाड्यातल्या (Marathwada) एखाद्या दुष्काळी (Draught) गावाचं नाही. तर ही स्थिती आहे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या शहापूर (Shahapur) तालुक्यातल्या ओव्हळवाडीतली. मुंबईला पाणी पुरवणारी तानसा, भातसा, वैतरणा ही 3-3 धरणं या तालुक्यातली. मात्र शहापूरकरांच्या नशिबी मात्र दरवर्षी पाणीबाणीच...  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोटात बाळ आणि कडेवर पाण्याचा हंडा घेऊन उन्हात वाट तुडवणाऱ्या या  सुरेखाबाई.. पोटात बाळासोबत घरच्यांच्या तहानेची काळजी घेण्याची जबाबदारीही त्यांच्याच डोक्यावर आलीय. दुसरीकडे बारकू मानेंच्या भावजय असंच पाणी भरताना एक दिवस दगडात पडून रक्तबंबाळ झाल्या. मात्र अंगावरची जखम पोटातल्या तहानेपेक्षा यांच्यासाठी मोठी नाही.


3-3 धरणं तालुक्यात असूनही घोटभर पाण्यासाठी अशी ही वणवण.  भावली धरणाच्या योजनेचंही गाजरच होतं हे धूळ खात पडलेल्या पाईपांकडे बघून कळतंच आहे. पण याचं सोयर सुतक ना प्रशासनाला ना नेतेमंडळींना. 


शहापूरचं भौगोलिक क्षेत्र
शहापूर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र हे डोंगर उताराचं आहे. पावसाळ्यातील पाणी बहुतांशी पाणी नदी, डोंगर माथ्यावरून खाली वाहून जातं. त्यामुळे पिण्यासाठी नदी, ओहळांमधून मुबलक पाणी उपलब्ध होत नाही, मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्व धरणे शहापूर तालुक्यातील गांवखेड्यांच्या आजूबाजूला आहेत. पण इथल्या पाणी या गांवखेड्यांना मिळत नाही. 


दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शहापूर तालुका पाणी टंचाईला तोंड देत आहे. इथल्या ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी उन्हातान्हात भटकंती करावी लागत आहे. त्यातच जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात उष्णतेची लाट पसरली आहे. जीव घेण्या उन्हामुळे या गावातील महिला आणि गांवकऱ्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरचे चातकाप्रमाणे वाट पाहावी लागते


नेतेमंडळींना एकच सांगणं आहे, आदिवासी ही फक्त वोटबँक नाही. ती हाडामांसाची माणसं आहेत. त्यांच्याही मुलभूत गरजा आहेत. मुंबईकरांइतकेच त्यांचेही प्रश्न गंभीर आहेत. तेव्हा मुंबईकरांच्या सोय तत्परतेनं करणाऱ्या नेतेमंडळींनी आदिवासींच्या हंडाभर पाण्याचीही सोय करण्याची तसदी घ्यावी हीच विनंती.