मुंबई : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगालाच वेठीस धरलं आहे. कोरोनानंतरचं राज्याचं व्हिजन काय असेल? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. यासाठीच 'झी २४ तास'ने ' ई-संवाद - महाराष्ट्र एक पाऊल पुढे' या खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी कृषी क्षेत्रापासून ते उद्योग क्षेत्रापर्यंत महाराष्ट्राला कशाप्रकारे संधी आहे, याबाबत सविस्तर भाष्यं केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सावरण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. कोरोनाच्या संकटात आपल्याला आव्हानाबरोबरच संधीही चालून आली आहे. या संधीचा फायदा घेण्याची गरज असल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलं. भविष्यामध्ये आपल्याला निर्यात वाढवण्याचा आणि कृषी क्षेत्राला जोडधंद्याची गरज असल्याचा सल्ला पवारांनी दिला. 


कृषी क्षेत्राला जोडधंद्याची गरज 


पाणी कमी असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना दुधाची आणि शेळी-मेंढपाळ व्यवसायाची जोड देण्याची गरज आहे. दुधावर आधारित पदार्थ तयार करून या माध्यमातून देशातल्या आणि देशाबाहेरच्या बाजारपेठा हस्तगत करता येतील. यासाठी पिढ्यानपिढ्या वापरणाऱ्या गायी-म्हशींच्या वाणात सुधारणा करण्याची गरज असल्याचं पवारांनी सांगितलं. जिराईत शेतीसाठी दुग्ध व्यवसायाचा हा जोडधंदा उपयुक्त ठरेल, असं शरद पवारांना वाटतंय.


दुसरीकडे बागायती शेती असणाऱ्या ठिकाणीच फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारणं आणि या फळांवर प्रक्रिया करून त्यांना देशात आणि देशाबाहेरची बाजारपेठ उपलब्ध करून देणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. 


ब्राझीलनंतर भारत हा साखरेचा दुसरा मोठा निर्यातदार देश आहे. भारतातही महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचं साखर निर्मितीतलं योगदान मोठं हे. निर्यातीसाठी लागणारा समुद्र उत्तर प्रदेशाला नाही तर महाराष्ट्राला उपलब्ध आहे. त्यामुळे आपण जगाच्या बाजारपेठेमध्येही उतरू शकतो, असं शरद पवार म्हणाले. 


ऊसापासून साखर बनवल्यानंतर त्यानंतर उरलेल्या ऊसाच्या मळीपासून इथेनॉल बनवण्यावरही जोर देणं गरजेचं असल्याचं शरद पवार म्हणाले. कोरोनाच्या संकटात इंधनाच्या किंमती वाढत आहेत. इंधन आयात केल्यामुळे देशाच्या परकीय चलनावरही बोजा पडतोय. इथेनॉल इंधनामध्ये वापरलं तर आयात कमी होईल आणि देशाचं परकीय चलन वाचेल. सोबतच शेतीच्या अर्थव्यवस्थेलाही ताकद मिळेल, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला. 


ऊसापासून साखर न घेता थेट इथेनॉल घेण्याबाबतचा विचारही अनेकांनी बोलून दाखवला आहे. याबाबतही अभ्यास करण्याची गरज असल्याचं मत पवारांनी मांडलं. 


चीनपासून लांब जायचा विचार 


कोरोना व्हायरसच्या संकटात जगाचा चीनपासून लांब जायचा विचार सुरू झाला आहे. चीन कमी किंमतीत माल निर्यात करतो. पण हा माल विकत घेण्याबाबात जगात वेगळा विचार सुरू झाला आहे. हा विचार जसा वाढेल, तशी संधी आपल्याला मिळेल. दुसरीकडे कोरोना व्हायरसचा विपरित परिणाम अमेरिकेवर झाला आहे. याचा फायदा घेऊन जागतिक बाजारपेठेतील कमतरता भागवण्याची संधी म्हणून याकडे बघितलं गेलं पाहिजे, असं शरद पवार म्हणाले. 


उद्योगांना संधी 


कोरोनाच्या काळात अनेक मजूर हे त्यांच्या राज्यात निघून गेले आहेत. याचा फायदा राज्यातल्या बेरोजगार तरुणांना करून देता येऊ शकेल. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहेत. यामध्ये अनेक बेरोजगार तरुणांनी नावं नोंदवली आहेत. राज्यातल्या या बेरोजगार तरुणांची फौज उद्योगांसाठी उपलब्ध करून दिली पाहिजे. असं पवारांनी सांगितलं. 


जगाला गोष्टींची गरज आहे, त्यामुळे राज्यात उद्योग उभे करण्याची संधी आली आहे. यासाठी पुढे येणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली, तर पुन्हा भरभराट आणता येईल, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला. 


समुद्र किनारा असल्यामुळे महाराष्ट्राला निर्यातक्षम व्यवसाय उभे करण्याची चांगली संधी आहे. समुद्र नसल्यामुळे उत्तरेकडच्या राज्यांना याचा लाभ घेता येत नाही. निर्यातीच्या वस्तूंची निर्मिती त्याच परिसरात करून समुद्राच्या बंदराचा उपयोग राज्याला करता येईल, यामुळे जगाची बाजारपेठ आपण ताब्यात घेऊ शकतो, असं पवारांना वाटतं.


सेवा क्षेत्रामध्येही संधी 


बँकिंग, इन्श्यूरन्स आणि आयटी या सेवा क्षेत्रांमध्येही कोरोनानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या संधींचा पुरेपुर लाभ घेण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.