मुंबई : राज्यात सोमवारी, २१ ऑक्टोबर २०१९ रोजी  विधानसभा निवडणुकीकरता मतदान पार पडले. राज्यात सुमारे ५८.४९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. २०१४ च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी यंदा घटली असल्याचं समोर आलं आहे. घसरलेल्या टक्केवारीमुळे मोठी उलथापलथ होण्याची शक्यता कमी असल्याचं सांगण्यात येत आहे. मतदान करताना राज्यातील मतदारांनी २०१४च्या निवडणुकीएवढा उत्साह दाखवला नाही. याचा फटका पक्षांना पडणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. संपूर्ण मतदान प्रक्रियेत महाराष्ट्रातील विविध मतदार संघांमध्ये मतदारांनी आपलं मत नोंदवलं. समोर आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ५८.४९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यामध्ये बाजी मारली ती म्हणजे कोल्हापूरकरांनी. सायंकाळी सहा वाजेपर्यंत हाती आलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार कोल्हापूरात तब्बल ७४ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. त्यामागोमाग सिंधुदूर्गात ६०. ८३ टक्के इतक्या मतदानाची नोंद करण्यात आली. 


राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे. 


राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू झालं होतं. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली होती, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


राज्यात ९५,४७३ मुख्य तर १,१८८ सहाय्यक अशी एकूण ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे उभारण्यात आली. चार कोटी ६८ लाख ७५ हजार, ७५० पुरुष तर चार कोटी २८ लाख ४३ हजार ६३५ महिला असे एकूण आठ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी दोन हजार ६३४ तृतीयपंथी, तीन लाख ९६ हजार अपंग आणि एक लाख १७ हजार ५८१ सर्व्हिस मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.