Maharashtra Election Commission:  हरियाणा आणि जम्मू-काश्मीरबरोबर महाराष्ट्रातील निवडणूक कार्यक्रमाची घोषणा न झाल्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळालं. पराभवाच्या भितीने सत्ताधारी निवडणूक लावत नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे तर सरकारकडून आमचा सरकारी योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यावरच भर असल्याचं सांगत निवडणूक पुढे ढकलल्याचे आरोप फेटालून लावले जात आहेत. खरं तर हरियाणा आणि महाराष्ट्रातील मागील तीन विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या. मात्र यंदा महाराष्ट्रातील निवडणूक कार्यक्रम जारी करण्यात आलेला नाही. मात्र निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली नसली तरी लवकरच होण्याचे संकेत मिळत आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील आगामी निवडणुकांच्या तयारीला लागल्याचं चित्र दिसत आहे.


निवडणूक आयोगाची बैठक महत्त्वाची का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अद्यापही जाहीर न झालेली राज्यातील विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्येच होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यामध्ये निवडणूक आयोगाकडून निवडणूक घेण्यासंदर्भातील चाचपणी आणि तपासणी सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील मुख्य निवडणूक आधिकारी 13 सप्टेंबर रोजी राज्यातील निवडणुकीच्य तयारीचा आढावा घेणार आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक आधिकाऱ्यांची मुख्य निवडणूक आयुक्तांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक होणार आहे.. राज्यातील  निवडणूक कर्मचारी, मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्रांसहीत इतर गोष्टींचा आढावा बैठकीतून घेण्यात येणार आहे.. त्यामुळे निवडणूक आयोग कामाला लागल्याचं चित्र दिसत आहे. राजकीय पक्षांनीही कामाला सुरुवात केल्याचं चित्र दिसत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागावाटपाच्या चर्चांना वेग आल्याचं पाहायला मिळत असून पुढील काही आठवड्यांमध्ये जागावाटपाचं चित्र स्पष्ट होईल असं सांगितलं जात आहे.


दिवाळी आधी सरकार, राष्ट्रपती राजवटीची शक्यता ते आता तयारी


महाराष्ट्रातील निवडणुका या हरियाणाबरोबर जाहीर होतं असं मानलं जात होतं. मात्र काही आठवड्यांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने केवळ हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीमधील पक्षांना राज्यात म्हणावं तस यश मिळालं नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीमधील घटकपक्षांना अपेक्षेहून चांगलं यश मिळालं. लोकसभेमधील ट्रेण्ड कायम राहिल्यास याचा महायुतीमधील घटक पक्षांना फटका बसू शकतो म्हणूनच निवडणूक पुढे ढकलण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. महाराष्ट्राला दिवाळीपूर्वी नवं सरकार मिळेल असंही काही जाणकारांचं म्हणणं होतं. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील विधानसभेची मुदत संपल्यानंतर गरज पडल्यास काही काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तयारीही असल्याची माहिती समोर येत आहे. काही आठवड्यांच्या राष्ट्रपती राजवटीचाही विचार केला जाईल असं वाटत असतानाच आता निवडणूक आयोगाने दुसरीकडे निवडणुकांची तयारी सुरु केल्याने राजकीय घडामोडींना वेग येईल हे निश्चित आहे.