MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत जागावाटपावरून काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात वाद पेटला आहे, नाना पटोले (Nana Patole) विदर्भातील तिढ्याच्या जागांवर अडून बसल्याची सूत्रांची माहिती आहे. नाना पटोलेंच्या भूमिकेविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याची चर्चा आहे. तसंच नाना पटोले असतील तर जागावाटप बैठकीत सहभागी होणार नसल्याचे ठाकरे गटाचे म्हणणं आहे. नाना पटोले यांच्या भूमिकेमुळे जागावाटपर अडत असल्याचं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आपल्या कानावर काही आलं नसल्याचं सांगितलं आहे. तसंच तुटेपर्यंत ताणू नये अशा शब्दांत काँग्रेसला इशाराही दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकापेक्षा जास्त पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवतात तेव्हा जागांच्या बाबतीत थोडी खेचाखेची होते. पण ती तुटेपर्यंत ताणायची नाही हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवं अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला खडसावलं आहे. जागावाटपावरुन काँग्रेससह मतभेद होत असल्याबद्दल विचारलं असता माहिती घेऊन बोलेन असं ते म्हणाले. 


त्यांनी यावेळी सांगितलं की, "एकापेक्षा जास्त पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवतात तेव्हा जागांच्या बाबतीत थोडी खेचाखेची होते. पण ती तुटेपर्यंत ताणायची नाही हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवं. फार मोठा तंटा झालेला नाही. पण माझ्या कानावर काही आलेलं नाही. माझ्या कानावर येईल तेव्हा त्यावर भाष्य करेन. येत्या दोन-तीन दिवसात किंवा उद्या जागावाटप संपू शकतो इतक्या अंतिम टपप्यात आला आहे". प्रत्येक पक्ष वेगळा आहे. आम्ही आजपर्यंत एकमेकांविरोधात लढलो आहोत. लोकसभेत जागा कमी होत्या. आता जास्त आहेत असंही त्यांनी सांगितलं. 


मविआत जागावाटपावरुन तिढा


जागावाटपात नाना पटोले घेत असलेल्या भूमिकेविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. विदर्भातील काही जागांवर तिढा अजून सुटलेला नाही. विदर्भातील काही जागांवर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दोघेही आग्रही आहेत. त्यात नाना पटोले  आणि संजय राऊत यांच्यात कालच्या बैठकीमध्ये याच जागांवरून खटके उडाले होते. 


पटोले विदर्भातील तिढा असलेल्या जागांवर अडून  बसल्याची तक्रार शिवसेना UBTच्या नेत्यांनी  काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केल्याचं कळत आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना या जागांवर लवकरात लवकर निर्णय व्हावा असा मविआचा प्रयत्न आहे. मात्र पटोलेंची भूमिका जागावाटप पूर्ण करत असताना अडचणीची ठरत असल्याचं शिवसेनाच्या नेत्यांचं म्हणणं आहे.