Maharashtra Assembly Election Zeenia Exit Poll: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. निकाल लागण्यापूर्वीच एक्झिट पोलचे अंदाज समोर यायला लागले आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज आहे. तर, काँग्रेस सर्वाधिक फायदा होणारा पक्ष ठरणार आहे. मात्र, अजित पवारांची राष्ट्रवादी सहाव्या क्रमांकाचा पक्ष ठरणार असल्याचा पोलचा अंदाज आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार यांनी बंड करुन महायुतीत येण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीत त्यांची जादू फार चालली नाही. कारण त्यांच्या पक्षाचा एकच खासदार निवडून आला. आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार अजित पवारांची राष्ट्रवादी सहाव्या क्रमांकावर जाईल असा अंदाज आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ४२ हून अधिक जागांवर यश मिळेल असं विविध एक्झिट पोल्स सांगत आहेत. तर दुसरीकडे हेच एक्झिट पोल अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २२ ते २५ जागा मिळतील असा अंदाजही वर्तवत आहेत. 


बारामतीत अजित पवारांसमोर युगेंद्र पवारांचे आव्हान होते. पवारांनी अजितदादांविरोधात घरातीलच व्यक्तीला उभं केल्याने बारामतीत अटी-तटीची लढत होती. त्यामुळं बारामतीत विधानसभेला काय निकाल लागणार, हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. लोकसभेत अजित पवारांनी त्यांच्या सुप्रिया सुळेंच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली होती. सुप्रिया सुळेंचा विजय झाला होता. हा अजित पवारांसाठी मोठा धक्का होता. 


काँग्रेस ठरणार दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष?


महाराष्ट्रात भाजपा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पार पडला आहे. यानंतर आलेल्या एक्झिट पोल्समध्ये भाजपा क्रमांक एकचा तर काँग्रेस क्रमांक दोनचा पक्ष असणार असा अंदाज आहे. एका पोलच्या अंदाजानुसार काँग्रेसला ५० हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे.


भाजपा ठरणार सर्वात मोठा पक्ष


एक्झिट पोल्सचे जे अंदाज समोर आले आहेत. त्यानुसार भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. तर काँग्रेस सर्वाधिक फायदा होणारा पक्ष ठरणार आहे. भाजपाला ८० ते ११० जागा मिळतील असे अंदाज आहेत. त्यापाठोपाठ ५८ ते ७० जागांचा अंदाज काँग्रेसला वर्तवण्यात आला आहे. नेमकं काय होणार ते २३ नोव्हेंबरला ठरणार आहे.