`कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यासाठी...`; अजित पवारांचा उल्लेख करत कोश्यारी मोठ्याने हसू लागले
Bhagat Singh Koshyari On Ajit Pawar Deputy Cm Post: राज्यपाल पद का स्वीकारलं इथपासून ते राज्यपाल पद सोडण्यापर्यंतच्या अनेक विषयांवर कोश्यारी यांनी मनमोकळेपणे भाष्य करताना अजित पवार आणि शरद पवार यांचाही उल्लेख केला.
Bhagat Singh Koshyari On Ajit Pawar Deputy Cm Post: उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी 'इंडिया टुडे'च्या कार्यक्रमामध्ये राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात एक सूचक विधान केलं आहे. पहाटेच्या शपथविधीचा संदर्भ देत भगत सिंह कोश्यारींनी हे विधान केलं आहे. कोश्यारी हे 'इंडिया टुडे स्टेट ऑफ द स्टेट : उत्तारखंड फर्स्ट' या कार्यक्रमात सहाभागी झाले होते. तेव्हा त्यांनी उत्तराखंडमधील राजकारण, महाराष्ट्रातील राजकारण आणि विकास यासंदर्भात भाष्य केलं.
अजित पवारांबद्दल बोलले अन् जोरात हसले
2019 च्या पहाटेच्या शपथविधीसंदर्भात बोलताना कोश्यारींनी उपमुख्यमंत्री पदाबद्दल विधान केलं. "महाराष्ट्रामधील अजित पवार हे उत्तम राजकीय नेते आहेत. आपल्या राज्यात (उत्तराखंडमध्ये) असा एक नेता आहे जो कितीही वेळा पराभूत झाला तरी पराभव मान्य करत नाही. तसेच अजित पवार यांचं उपमुख्यमंत्री पदासंदर्भात आहे. ते कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यासाठी तयार असतात," असं विधान करत कोश्यारी जोरात हसू लागले. "मला कधी कधी त्यांची दयाही येते. फार चांगले आणि हुशार व्यक्ती आहेत. त्यांना जनाधारही फार आहे. संघटनेमध्ये त्यांचं उत्तम वजन आहे. अनेक आमदार आणि खासदार त्यांच्या बाजूने असतात. प्रत्येकाचं आपलं एक व्यक्तीमत्व असतं," असं अजित पवारांबद्दल बोलताना कोश्यारी यांनी सांगितलं.
पवारांबद्दलही केलं भाष्य
शरद पवारांसंदर्भातही कोश्यारींनी भाष्य केलं आहे. 'शरद पवार हे देशातील वरिष्ठ नेते आहेत. आजही त्यांचा सर्वजन सन्मान करतात. शरद पवार जेव्हा जेव्हा भेट घेण्यासाठी राजभवनामध्ये आले तेव्हा तेव्हा मनातलं बोलून गेले. व्यक्तीगतरित्या मी त्यांचा फार आदर करतो. त्यांच्याबरोबर मी दोन वेगवेगळ्या विद्यापिठांमध्ये पदवी स्वीकारली आहे. माझं सौभग्य आहे की रतन टाटा यांना पदवी प्रदान करण्याची संधी मला मिळाली. शरद पवार हे माझ्यापेक्षा 8 ते 10 महिन्यांनी मोठे आहेत. त्यामुळे मी त्यांचा सन्मान करतो. ते चांगले राजकारणी आहेत,' असं कोश्यारी म्हणाले.
...म्हणून राज्यपाल झालो
महाराष्ट्राचं राज्यपाल पद सोडून येण्यासंदर्भात कोश्यारी यांना विचारण्यात आलं असता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इच्छेनुसार आपण ही जबाबदारी स्वीकारल्याचं सांगितलं. 2016 मध्ये मी घोषणा केली होती की 2019 ची निवडणूक लढवणार नाही. त्यावेळी पक्षाचे अध्यक्ष अमित शाह होते. एका बैठकीमध्ये मी सक्रीय राजकारण करणार नाही असं सांगितलं होतं. मात्र पंतप्रधानांनी मला महाराष्ट्राचं राज्यपाल पद स्वीकारण्याचा आदेश दिले. माझे शुभचिंतक खास करुन माझ्या लहान भावाने पंतप्रधानांच्या म्हणण्याचा आपण आदर राखला पाहिजे असं मला सांगितलं. काही दिवस का असेना हे पद स्वीकारावं आणि तिथे जावं असं मला सुचवण्यात आलं. मी ते स्वीकारलं. याच कारणाने मी महाराष्ट्रात गेलो, असंही कोश्यारी म्हणाले.
मोदींनी कळवलं की...
मी महाराष्ट्रामध्ये शक्य ती सेवा केली किंवा करण्याचा प्रयत्न केला. राजभवनाच्या उद्घाटनासाठी मी पंतप्रधानांना आमंत्रित केलं होतं. त्यावेळी त्यांना मी एक निवेदन दिलं. त्यामध्ये मी इथं येण्यास इच्छूक नव्हतो. पण प्रेम ही अशी गोष्ट असते की तुम्हाला निर्णय बदलायला लावले. मी तुमच्यावरील प्रेमापोटी इथं (महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून) आलो. मला संधी देण्यासाठी धन्यवाद, असं कळवल्याचं कोश्यारी म्हणाले.