दिवाळी उलटून गेली मात्र, कर्जमाफीची प्रतीक्षा कायम
मराठवाड्यात तर कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा झालेले नाहीत
जयेश जगड, झी मीडिया, अकोला : मराठवाड्यात तर कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा झालेले नाहीत. विदर्भातही यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही. अजूनही पैसे जमा न झाल्यानं शेतकरी संभ्रमात आहे. अकोला जिल्ह्यात काय वास्तव आहे ते पाहूया...
प्रकाश चुंगडे हे अकोला जिल्ह्यातल्या सोमठाणा गावचे शेतकरी. प्रकाश यांच्याकडे ५ एकर शेती. त्यांच्यावर बँकेचं दीड लाखांचं कर्ज. खाण्याचीच भ्रांत असतांना कर्ज कसं फेडायचं याची चिंता त्यांना सतावत होता. मात्र, सरकारनं कर्जमाफी जाहीर केलीय अन प्रकाश यांना दिलासा मिळाला.
मात्र, ऑनलाईनच्या सरकारी खेळात वारंवार बदलणाऱ्या नियमांनी ते त्रासून गेलेत. कर्जमुक्त होणार असल्यानं त्यांनी तो त्रासही सहन केलाय. दिवाळीत कर्जमाफी होईल अशी आशा होती. मात्र आता दिवाळीही गेलीय. त्यांच्या खात्यात अद्यापही पैसे जमा झालेले नाहीयेत. अशीच स्थिती रामदास दुतोंडे यांच्यासह गावातल्या दीडशे शेतकऱ्यांची आहे.
कर्जमाफीच्या लाभार्थी यादीत नावं नसल्यामुळं अनेक शेतकरी चिंतेत आहेत. मात्र, सोमठाणा गावातीलच शेतकरी पवन इंगळेंना वेगळीच चिंता लागलीये. त्यांचं नाव कर्जमाफी लाभार्थ्यांच्या ग्रीन लिस्टमध्ये असूनही खात्यात आतापर्यंत एक रुपयाही जमा झाला नाहीये. कर्जमाफीच्या गोंधळामुळे शेती प्रश्नाचे अभ्यासकही चिंतेत आहेत.
गतीमान सरकारचा डांगोरा पिटणाऱ्या फडणवीस सरकारची ऐतिहासिक कर्जमाफी नेमकी कधी मिळेल याचीच चातकासारखी बळीराजा वाट पाहतोय.