उद्ध्वस्त कोल्हापूर : अवकाशातून आज असा दिसतोय पूरग्रस्त भाग
पूर ओसरला असला तरी कोल्हापूर जिल्ह्यातली अनेक गावं अजूनही पाण्यातच आहेत
प्रताप नाईक, झी २४ तास, कोल्हापूर : गेल्या आठ दिवसांपासून पाण्यात बुडलेल्या कोल्हापूर जिल्ह्याची अवस्था अजूनही गंभीर आहे. अनेक गावांना अजूनही पुराचा वेढा आहे. या गावांना आता लष्कर आणि हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून मदत पोहचवली जात आहे. इथली गाव कोणत्या परिस्थितीत आहेत? शेतीचं काय चित्र आहे? या सर्व परिस्थितीचा थेट लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी आढावा घेतला.
पंचगंगा नदीचं पाणी आठ दिवसानंतरही कोल्हापूर शहराच्या उत्तरेला पसरलेलं दिसतंय. पूर ओसरला असला तरी कोल्हापूर जिल्ह्यातली अनेक गावं अजूनही पाण्यातच आहेत. शेतकरी उद्ध्वस्त झालाय. अनेक ठिकाणी ऊसाचं पिक शेतातच कुजलेल्या आणि सडलेल्या अवस्थेत दिसतंय. या पुरात अनेक मुक्या जनावरांनी आपला जीव गमावलाय. या जनावरांचे मृतदेहही ठिकठिकाणी पाण्यातच कुजलेल्या अवस्तेत आहेत.
अतिवृष्टीचा इशारा
दरम्यान, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील घाट क्षेत्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. पुढील दोन दिवसांसाठी पुणे वेधशाळेने हा इशारा दिलाय. विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यातही हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिलाय. याशिवाय रायगड, रत्नागिरी आणि पालघरमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. बंगालच्या उपसागरात ओडिशाजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पूर्व विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
राज्याची केंद्राकडे मदतीची मागणी
पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे ६८०० कोटींची मागणी केलीय. कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातल्या पूरग्रस्तांसाठी ४७०० कोटी रुपयांची तर कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांसाठी २१०५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आलीय. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलीय.