पुरातून बाहेर काढले, आयर्विन पुलावर पुन्हा अडकलेत
पुरातून बाहेर काढून आयर्विन पुलावर आणून सोडलेले १५० जण पुन्हा पुराच्या फेऱ्यात
सांगली : सांगलीवाडीमधून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी आयर्विन पुलावर आणून सोडलेले १५० जण या पुलावरच अडकून पडले आहेत. प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसला आहे. आयर्विन पुलावर अडकून पडलेल्या महिला आणि लहान मुलांना सहन करावा लागत आहे. गंभीर बाब म्हणजे या दीडशे जणांच्या खाण्यापिण्याची कुठलीही सोय नाही. आयर्विन पुलाजवळ तब्बल ५७ फूट इतकी पाणी पातळी आहे, तर पूर्वेला टिळक चौक आणि पश्चिमेला सांगलीवाडी इथेही पाणी आहे. त्यामुळे आयर्विन पुलावरच हे दीडशे जण अडकून पडले आहेत.
२२३ गावांना पुराचा फटका; २७ जणांचा बळी
जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने मदत कार्य पोहोचवण्याचे आश्वासन या पूरग्रस्तांना दिले आहे. सांगलीवाडीतल्या या नागरिकांना आता बोटीची प्रतीक्षा आहे. त्यानंतच त्यांची सुटका होऊ शकणार आहे. सांगलीतल्या भिलवडीमध्येही पूरस्थिती गंभीर आहे. इथे गेल्या तीन दिवसांपासून नागरिक अडकून पडले आहेत. पुरात पडलेल्यांचा आकडा सुमारे अडिच हजार ते तीन हजार असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या सर्वांच्या खाण्यापिण्याची आबाळ होत आहे. त्यामुळे तातडीनं इथल्या लोकांना बोटी, तसंच आरोग्य पथकांची सोय पुरवण्याची मागणी, या पुरात अडकलेल्या भिलवडीमधल्या स्थानिकांनी केली आहे.