उपमुख्यमंत्रिपदाच्या ऑफरबद्दल स्पष्टच बोलले श्रीकांत शिंदे! म्हणाले, `...अशी माफक अपेक्षा`
Shrikant Shinde On Maharashtra Deputy CM Offer: मागील अनेक दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मुलासाठी म्हणजेच खासदार श्रीकांत शिंदेंसाठी उपमुख्यमंत्री पदाची मागणी केल्याचीही जोरदार चर्चा आहे. यावरच आता स्वत: श्रीकांत शिंदेंनी भाष्य केलं आहे.
Shrikant Shinde On Deputy CM Offer: महायुतीला ऐतिहासिक बहुतम मिळून एक आठवडा उलटून गेल्यानंतरही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. महायुतीमधील घटक पक्षांमध्ये सत्तेचं वाटप कसं होणार? मुख्यमंत्री कोण होणार? यासारख्या प्रश्नांवर चर्चा सुरु असून त्यावर तिन्ही पक्षांना मान्य होईल असा समाधानकारक तोडगा निघालेला नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सध्या महाराष्ट्रात सरकार कधी स्थापन होणार याचीच चर्चा आहे. मात्र असं असतानाच वेगवेगळ्या शक्यतांसंदर्भातील बातम्या समोर येत आहेत. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला काय ऑफर दिली जाणार याबद्दलच्या शक्यता व्यक्त केल्या जात असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र आता यावर स्वत: श्रीकांत शिंदेंनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
'मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या...'
श्रीकांत शिंदेंनी त्यांच्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत," असा खुलासा श्रीकांत शिंदेंनी केला आहे.
"लोकसभा निवडणुकीनंतरही मला..."
तसेच पुढे बोलताना श्रीकांत शिंदेंनी, "लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे," असंही म्हटलं आहे.
"माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता..."
"माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो, परंतु बातम्या देतांना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा," असा खोचक टोलाही पोस्टच्या शेवटी श्रीकांत शिंदेंनी प्रसारमाध्यमांना लगावला आहे.
एकनाथ शिंदेंनीही यावर केलेलं भाष्य...
स्वत: एकनाथ शिंदेंनी रविवारी दुपारी आपलं मूळ गाव असलेल्या दरेगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये श्रीकांत शिंदेंच्या नाव उपमुख्यमंत्री पदामुळे चर्चेत असल्याच्या विषयावर भाष्य केलं होतं. उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे यांचं नाव समोर येत आहे, हे खरं आहे का? असा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना शिंदेंनी, "हे पाहा, चर्चा अजून सुरु आहेत. तुम्ही चर्चा करत असता. तुमच्या चर्चा खूप जास्त असतात. त्यामुळेच ही (श्रीकांत यांना उपमुख्यमंत्री पद हवं अशी) चर्चा आहे. एक बैठक अमित शाह यांच्याशी झाली आहे. आता तिघांची एक बैठक होईल आणि त्यात साधक बाधक चर्चा होईल आणि त्यातून महाराष्ट्राच्या हिताचा योग्य तो निर्णय घेतला जाईल," असं उत्तर दिलेलं.