महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला मुख्यमंत्री? उद्धव ठाकरे यांच्या विधानाने चर्चांना उधाण
Uddhav Thackeray : शिंदे गटाने साथ सोडल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांसह इतर पक्षांनी देखील उद्धव ठाकरे यांना साथ दिली आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याने नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत
Maharashtra Politics : राज्यांतील सत्तातरानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कमालीचे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. शिंदे गटासह (Shinde Group) भाजप नेत्यांवर सातत्याने त्यांच्याकडून टीका केली जात आहे. अशातच महाविकास आघाडीसह इतर पक्षही उद्धव ठाकरे यांची साथ देत आहेत. वंचित बहुजन आघाडीने उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. तर बुधवारी लहुजी संघटनेनेही उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे येत्या काळात शिवशक्ती, भीमशक्ती, लहुशक्ती एकत्र आल्याचे पाहायला मिळणार आहे. या तिन्ही शक्तींचा मिळून मुख्यमंत्री बसवणार असे वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
लहुजी साळवे यांच्या जयंती महोत्सवाचा कार्यक्रम वांद्रे येथे पार पडला. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली यावेळी ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेगळा मार्ग दाखवला. शिवशक्ती, भीमशक्ती आणि आता लहू शक्ती एकत्र येत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र यावेळी बोलताना महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री पाहायला मिळू शकतो असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
"तुम्ही सांगितलं की मला पुन्हा मुख्यमंत्री करायचं आहे. पण मला मुख्यमंत्री करण्याची गरज नाही. पण माझ्या हक्काचा शिवशक्ती, भीमशक्ती लहुशक्तीचा एक कर्तबगार माणूस मग ती महिला असेल किंवा पुरुष असेल, आपल्याला मुख्यमंत्रिपदी बसवायचा आहे. हे स्वप्न नुसतं स्वप्न न राहता सत्यात उरवायचं असेल तर तुम्हाला सोबत येऊन वाड्या वस्त्यांमध्ये ही विचारांची मशाल घेऊन जावी लागेल," असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.