मोठी बातमी: राज्यातील आणखी ९०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर होणार
पावसाळा सुरू होण्यास अद्याप पाच ते सहा महिन्यांचा कालावधी आहे.
मुंबई: राज्यातील आणखी ९०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. मंत्रालयात दुष्काळ निवारणासाठी नियुक्त केलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यात आला. ५० पैसा पेक्षा कमी आणेवारी असलेली व कमी पर्जन्यमान असलेल्या गावांचा या यादीत समावेश केला जाईल. राज्यात यापूर्वी १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. मात्र, यानंतरही आणखी काही भागांमध्येही बिकट परिस्थिती असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर उर्वरित गावांमध्येही दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली होती. सध्या मराठवाड्यासह विदर्भातील अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप पाच ते सहा महिन्यांचा कालावधी आहे. तोपर्यंत पाण्याचा प्रश्न आणखी तीव्र होणार आहे. त्यानुसार अनेक गावांतील पिकांची आणेवारी, भूजल पातळी असे विविध निकष तपासण्यात आले. त्यानंतर मंत्रालयात झालेल्या आढाव बैठकीत आणखी ९०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले.
मतमोजणीमुळे दुष्काळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीकडे मंत्र्यांची पाठ; नऊपैकी सात जण गैरहजर
सरकारकडून आज किंवा उद्या याबाबतची अधिसूचना काढली जाऊ शकते. त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य सरकारने १५१ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केला होता. यापैकी ११२ तालुक्यात गंभीर परिस्थिती असल्याचे समोर आले होते. तर राज्यातील ३९ तालुके मध्यम दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले होते.