मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या खेळात आता राष्ट्रवादीप्रमाणेच काँग्रेसचीही विरोधात बसण्याची मानसिकता असल्याचं काँग्रेस सूत्रांकडून सांगण्यात आलंय. गुरुवारी, राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर काँग्रेसची ही प्रतिक्रिया आलीय. 'शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचंही' काँग्रेसच्या सूत्रांनी स्पष्ट केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी गुरुवारीच दिल्लीत दाखल झाले आहेत. रात्रीपासूनच काँग्रेसच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी दिल्लीतच मुक्काम ठोकलाय. परंतु, सोनिया गांधींची भेट घेण्यासाठी मात्र त्यांना वाट पाहावी लागतेय. या नेत्यांना आपल्या पक्षाध्यक्षांना भेटण्यासाठी सकाळची वेळ मिळाली नसल्यानं ही भेट दुपारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.


दिल्लीत दाखल झालेल्या काँग्रेसच्या या नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचादेखील समावेश आहे. परंतु, इतर नेते सोनिया गांधींची भेट घेण्यासाठी शांघ्रीला हॉटेलमध्ये बसले असताना पृथ्वीराज चव्हाण हे मात्र आपल्या दिल्लीतील घरीच आहेत. थोड्या वेळानं ते माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची भेट घेणार असल्याचं समजतंय. 


भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीतल्या हालचालींना वेग आलाय. शिवसेनेला सरकार स्थापण्यासाठी मदत करता येईल का अशी चाचपणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यातले काँग्रेस नेते दिल्लीला दाखल झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे हे नेते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत आहेत. त्यामुळे सोनिया गांधी याबाबत काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.



पक्षीय बलाबल


भाजपा १०५


शिवसेना ५६


राष्ट्रवादी ५४


काँग्रेस ४४


बहुजन विकास आघाडी ३


एमआयएम २


समाजवादी पार्टी २


प्रहार जनशक्ती पार्टी २


माकप १


जनसुराज्य शक्ती १


क्रांतिकारी शेतकरी पार्टी १


महाराष्ट्र नवनिर्माण सेना १


राष्ट्रीय समाज पक्ष १


स्वाभिमानी पक्ष १


अपक्ष १३