जयेश जगड, झी मीडिया, अकोला : cotton ban News and Updates : महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी एक चांगला निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने 31 मे पर्यंत कापूस बियाणे विक्रीवर बंदी घातली होती. मात्र, ती बंदी 1 जूनपासून उठवण्यात आली आहे. त्यामुळे आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बियाणे खरेदी करण्यासाठी लगबग सुरु झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे आणि शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. बहुतांश भागात शेतीचे काम पूर्ण झाले आहेत तर आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे चांगल्या पावसाची. या खरीप हंगामात पांढर सोन समजल्या जाणाऱ्या कापसाच्या बियाणाच्या दरातही वाढ झाली आहे.


कापूस पिकाला मागील हंगामात चांगले भाव मिळाले यामुळे यंदा शेतकऱ्यानांचा कल पुन्हा कापसाकडे दिसून येत आहे. बाजारात आता शेतकऱ्यांची कापूस बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येत आहे.मात्र बियाणे उत्पादक कंपन्यांनी केलेली दर वाढ शेतकऱ्यांनाच पीक हाती येण्याआधीच कंबरडे मोडणार आहे. कापूस बियाण्याच्या दरात झालेली वाढ कापसाच्या पिकापर्यंतही कायम राहणार का असा सवाल उपस्थित होत आहेत.


यंदा अकोल्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला विक्रमी असा 14 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. त्यामुळे या खरीपात कापसाचे क्षेत्र वाढणार हे साहजिकच दिसून येत आहे.  कापसाच्या बियाण्याची मागणी पाहता यंदा कापसाच्या क्षेत्रात 12 ते 15 टक्के वाढ होणार असल्याचं अंदाज कृषी व्यवसायिकांनी लावला आहे.


कापूस बियाण्याचे दर वाढलेले आहेत त्यामुळे आता नवीन दराची अंमलबजावणी होणार आहे. ही दरवाढ बियाणे तयार करण्यासाठी होणारा खर्च वाढल्याने झाली असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे मागील वर्षी 767 रुपयांच्या  बियाणाच्या पाकीटसाठी शेतकऱ्यांना आता  810 रुपये मोजावे लागणार आहेय म्हणजेच प्रति पेकेट 43 रुपयांची वाढ झाली आहे. तर मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 6 टक्क्याने बियाणे भावात वाढ झाली आहे. म्हणून या हंगामापासूनच वाढीव दराने शेतकऱ्यांना बियाणांची खरेदी करावी लागणार आहे. मात्र बियाणे खरेदी केली ही असल्यास पेरणी योग्य पाऊस पडल्यावरच पेरणी करण्याचा सल्लाह कृषी विभागाने दिला आहे.