पंढरपूर : कार्तिकी एकादशीला (Karthiki Ekadashi) पंढरपुरात (Pandharpur) श्री विठ्ठल-रुक्मिणी (Vitthal Rukmini) मंदिरात, लाडक्या विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सपत्नीक उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा झाली. यावेळी त्यांच्यासोबत पार्थ आणि जय ही त्यांची दोन्ही मुलंही उपस्थित होती. तर सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. यावेळी कोरोनातून मुक्ती मिळो, असे साकडे अजित पवार यांनी विठ्ठलाला घातले.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आकर्षक सुंदर फुलांनी सजवण्यात आले आहे. पहाटे उपमुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यासाठी पुण्यातील भाविक राम जांभूळकर यांनी मंदिरात पुष्प सजावट केली. पिवळा, केशरी झेंडू, पांढरी शेवंती, जरबेरा लाल, पिवळा, पांढरा, केशरी आणि ऑर्किड अशा फुलांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा, चौखांबी, सोळखांबी आणि सभामंडपाला फुलांची आरास करण्यात आली. 


कार्तिकी एकादशी निमित्तानं पंढरीत विठ्ठल रूक्मिणी मंदिरात महापूजा कार्यक्रमाला मध्यरात्री उशीरापासूनच सुरूवात झाली. १ ते पाऊणे दोन दरम्यान विठोबा-रखुमाईची पाद्य पूजा, तसंच नित्य पूजा करण्यात आली. या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सव्वा दोन वाजण्याच्या दरम्यान विठ्ठल मंदिरात आगमन झालं. पहाटे अडिच ते ३ अशी श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर पहाटे ३ ते ३:३० दरम्यान, रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न झाली. त्यानंतर पाऊणे चार ते सव्वा चार दरम्यान मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 



दरम्यान, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमधील डौलापूर येथेली कवडूजी बोयर आणि कुसुमबाई भोयर या दाम्पत्याला पुजेचे मानकरी म्हणून मान मिळाला. हिंगणघाटमधील डौलापूरचे कवडूजी भोयर गेल्या दहा वर्षांपासून वीणेकरी म्हणून विठ्ठलाची सेवा करत आहेत. तर वयाच्या सातव्या वर्षापासून कवडूजी नित्यनियमाने पंढरपूरची वारी करत आहेत. देवाची महापूजा करण्याचा मान मिळाला हे सेवा केल्याचं फळ असल्याची भावना भोयर दाम्पत्यानं व्यक्त केली. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा निवडक मान्यवरांनाच मंदिरात महापूजेसाठी प्रवेश देण्यात आला होता. विशेष म्हणजे २०१२ आणि २०१३ मध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री असतानाही, त्यांना कार्तिकी एकादशीला महापूजेसाठी येता आले नव्हते. त्यामुळे तब्बल नऊ वर्षांनी अजित पवारांनी विठ्ठल-रूक्मिणीची महापूजा केली. दरम्यान कोरोनाचे संकट दूर होऊ दे. तसेच कोरोनावरची लस लवकर येऊ दे, अशी प्रार्थना यावेळी अजित पवारांनी विठ्ठल चरणी केली.