अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात अँटीजेन टेस्ट करण्यात आली होती. तेव्हा त्यांची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली होती. मात्र, आता खबरदारी म्हणून त्यांना राज्यभरात न फिरण्याची विनंती करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते सोमवारी अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठी बातमी: सिल्व्हर ओकवरील सहाजणांना कोरोनाची लागण

यावेळी राजेश टोपे यांनी शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरील सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. पवार साहेबांच्या 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी काम करणारे दोघे जण व पवार साहेबांचे तीन सुरक्षारक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. हे सगळे सुरक्षारक्षक लोकांना पवार साहेबांपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यातून ते काही लोकांच्या संपर्कात आले असण्याची शक्यता आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले. 

यावेळी राजेश टोपे यांनी लवकरच कोरोनावरील भारतीय लस उपलब्ध होईल, असे सांगितले. कोरोनाच्या लसीवर ऑक्सफर्ड आणि सिरममध्ये मानवी चाचण्या सुरु आहेत. सध्याची परिस्थिती पाहता आगामी दीड ते दोन महिन्यात कोरोनावरील भारतीय लस उपलब्ध होऊ शकते असे टोपे यांनी सांगितले.