`चला कर्नाटक नव्याने पाहूया` कर्नाटक पर्यटन विभागाकडून चक्क नागपुरात पोस्टरबाजी
उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात कर्नाटकची मुजोरी, मुख्यमंत्री शिंदे यांच्या मार्गात पोस्टरबाजीवरुन राजकारण तापलं... ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा इशारा
पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद प्रश्नामुळे (Maharashtra-Karnataka Border Dispute) गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) यांचं होम टाऊन नागपुरात (Nagpur) विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ''चला कर्नाटक नव्याने पाहूया'' अशा पद्धतीचे पोस्टर लागल्याने नवीनच वाद निर्माण झालाय. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarga) दौऱ्यावर असतांना लागलेल्या पोस्टरबाजीमुळ चर्चा रंगलीय. 'महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही' असं म्हणत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने (SSUBT) पोस्टर फाडून आक्रमक होत आंदोलन केलं.
कर्नाटकच्या पर्यटन विभागाकडून पोस्टरबाजी
नागपुरात आज सकाळीच कर्नाटक सरकारच्या पर्यटन विभागाकडून (Karnataka Tourism Department) 'चला नव्याने कर्नाटक पाहूया' अशा आशयाचे पोस्टर हॉटेल प्राइड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळापर्यंत मार्गावर लावण्यात आले होते. या पोस्टरमुळे सीमावाद पेटला असतांना त्यात नवीनच वाद निर्माण झाला. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आज नागपूर दौऱ्यावर असून समृद्धी महामार्गाची पाहणी करतायत. ते सकाळी याच मार्गावरून गेले. या पोस्टरवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोंम्मई यांच्या (Karnataka Chief Minister Basavaraj Bommai) फोटोसह पर्यटन मंत्री यांचाही फोटो होता. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रातील गावावर हक्क गाजवत असल्याने वातावरण तापले असतांना पोस्टार बाजींमुळे संताप व्यक्त करण्यात येतोय.
ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक
या पोस्टरबाजीवर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं. यावेळी नागपूर विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर शिवसेनेचे शहर अध्यक्ष नितीन तिवारी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. कर्नाटक सरकार मुर्दाबाद असे फलक हातात घेत जोरदार निदर्शने केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत असताना अश्या पद्धतीने पोस्टर लावून महाराष्ट्राचा अपमान आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात पोस्टार लावून महाराष्ट्राला कर्नाटक करायचे आहे का असा सवाल उपस्थित करत कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हे ही वाचा : मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीचं फडणवीसांच्या हाती स्टिअरिंग, समृद्धी महामार्गाची पाहणी
पोस्टर फाडून टाकले
ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी नागपूर विमानतळाच्या मार्गावर लावण्यात आलेले 'चला नव्याने कर्नाटक पाहूया' हे पोस्टर फाडून टाकत निषेध केला. शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारच्या पर्यटन विभागाच्या जाहिरातीचे पोस्टर फाडले. महराष्ट्रात अशा पद्धतीचे पोस्टर खपवून घेणार नाही. येत्या 24 तासात हे पोस्टर काढले नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल असाही इशारा यावेळी संतप्त होत शिवसैनिकांनी दिला. त्यामुळे आता हे पोस्टर काढले जाईल का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. सीमावाद वाद प्रश्न पेटला असताना आता नागपुरातही याचे पडसाद पाहायला मिळत आहे. या पोस्टरबाजीमुळे नवीन वाद निर्माण होतोय की काय असे चित्र सध्या नागपुरात निर्माण झाले आहे.