`ज्यांचा नवरा अजित पवारसोबत, बाप राष्ट्रवादीमध्ये...`, `आमचे 3-4 आमदार फुटणार` म्हणत विधान
Maharashtra Legislative Council Election 2024: विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीमध्ये मतदानाला सकाळी 9 वाजता सुरुवात झाली. 12 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भाजपाचे पाच, काँग्रेसचा एक, शिंदे गटाचे 2, अजित पवार गटाचे 2, ठाकरे गटाचे 2 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर 1 उमेदवार निवडणूक लढतोय.
Maharashtra Legislative Council Election 2024: विधानपरिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झाली असून सकाळी नऊ वाजल्यापासूनच आमदार विधानसभेमध्ये येऊन 11 जागांसाठीचा मतदानाचा हक्क पार पाडताना दिसत आहेत. या निवडणुकीमधील 11 जागांसाठी 12 उमेदवार असल्याने नेमका पराभव कोणाचा होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. असं असतानाच आता एका आमदाराने थेट आमचे 3 ते 4 आमदार फुटतील असा दावा केला आहे. विशेष म्हणजेच याच दृष्टीने आम्ही नियोजन केलं असल्याचंही या आमदाराने जाहीरपणे सांगितलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या पक्षाला ही निवडणूक सर्वात सोपी जाईल असं सांगितलं जात आहे त्याच पक्षातील आमदाराने हा दावा केला आहे. हे चार आमदार कोण आहेत याबद्दल सूचक संकेतही या आमदाराने दिलेत. (येथे क्लिक करुन वाचा विधानपरिषद निवडणुकीचे लाइव्ह अपडेट्स)
कोणकोण आहे निवडणुकीच्या रिंगणात?
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होत असलेली निवडणूक चुरशीची ठरणार आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असून, सर्वच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर असे 5 उमेदवार रिंगणात आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून कृपाल तुमाने आणि भावना गवळी असे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर असे 2 उमेदवार ही निवडणूक लढत असून काँग्रेसकडून प्रज्ञा राजीव सावत, शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर शेकापचे जयंत पाटील असे एकूण 12 उमेदवारांचं नशीब मतपेटीमध्ये कैद होणार आहे.
कोण केला आमदार फुटण्याचा दावा?
विधानपरिषद निवडणुकीत 274 आमदार मतदान करणार आहेत. एका उमेदवाराला विजयासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आलाय. महायुतीकडे 197 आमदारांचं संख्याबळ असून, त्यांचे 9 उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीकडे 69 आमदाराचं संख्याबळ असून, त्यांचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. असं असतानाच आता काँग्रेसच्या आमदाराने आमचे 3 ते 4 आमदार फुटतील असं म्हटलं आहे. स्वपक्षीय आमदार फुटण्याचा दावा आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात आम्हाला कल्पना आहे की आमचे 3 ते 4 आमदार फुटण्याची शक्यता आहे. त्यानुसार आम्ही आमची रणनितीही आखली आहे. याचा कोणताही दगाफटका आमच्या उमेदवाराला बसणार नाही याची काळजी घेण्यात आल्याचं गोरंट्याल म्हणालेत.
नेमकं काय म्हटलंय या आमदाराने?
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार गोरंट्याल यांनी, "मी तुम्हाला बोललोय की कोण कोण आहे. मी फक्त इशारा करतोय. ज्याचा बाप राष्ट्रवादीमध्ये गेला, ज्यांचा नवरा अजित पवारसोबत गेला, ज्याचा एक टोपीवाला आहे आणि एक आंध्रा आणि नांदेडच्या बॉर्डरवरचा एक आहे असे चार जे डाउटफुल आहेत. मी नावं सांगत नाही पण हे फुटतील," असं म्हटलं आहे. मतदानाला जाण्यापूर्वी त्यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली.
सर्वात सोपी निवडणूक काँग्रेसलाच
महाविकास आघाडीत काँग्रेसकडे सर्वाधिक 37 आमदार आहेत. त्यामुळं प्रज्ञा राजीव सातव पहिल्याच फेरीत निवडून येऊ शकतात. काँग्रेसकडे अतिरिक्त 14 मतं आहेत. ही मतं काँग्रेस कुणाच्या पारड्यात टाकणार, यावर शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे मतं फुटली तरी काँग्रेसच्या उमेदवाराला थेट धोका नसल्याचं चित्र दिसत आहे.