Maharashtra Nivadnuk Nikal 2024: सांगली लोकसभा निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणुक लढवणारे विशाल पाटील हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत. सांगलीत विशाल पाटील यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. अखेर विशाल पाटील यांनी बाजी मारत दोन्ही उमेदवारांना पराभूत केलं आहे. विशाल पाटील यांच्यासमोर भाजपचे संजय पाटील आणि ठाकरे गटाचे चंदहार पाटील यांचे आव्हान होते. सांगतील अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत अखेर विशाल पाटील यांनी विजय मिळवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरुवातीला सांगतील भाजपचे संजय पाटील आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांच्यात लढत होईल अशी चर्चा असतानाच विशाल पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केली. विशाल पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं सांगलीत कांटे की टक्कर पाहायला मिळाली होती. काँग्रेसनेदेखील ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. त्यामुळं ही निवडणुक चुरशीची ठरली होती. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवत असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागून राहिले होते. 


कोण आहेत विशाल पाटील? 


विशाल पाटील हे सांगलीचे चार वेळा खासदार राहिलेले प्रकाशबापू पाटील यांचे चिरंजीव तर राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री पाहिलेले वसंतदादा पाटील यांचे नातू आहे. त्यामुळं लहानपणापासूनच त्यांना राजकारणाचे धडे मिळाले आहेत. सांगलीत वसंतदादा पाटील घराण्याचा दबदबा आहे. विशाल पाटील यांचे मोठे बंधू प्रतीक पाटील हे सुद्धा 2 वेळा खासदार राहिले आहेत. तरुण, तडफदार नेतृत्व म्हणून विशाल पाटील यांच्याकडे पाहिले जाते. 


विशाल पाटील यांनी 2010 साली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढवत राजकारणात एन्ट्री केली होती. त्यानंतर 2015मध्ये जिल्हा बँकेची निवडणूक लढवली होती. 2021 मध्ये जिल्हा बँकेची निवडणूक एकतर्फी जिंकली होती. विशाल पाटील आता दुसऱ्यांदा लोकसभेसाठी उभे होते. 2019ला सुद्धा त्यांनी लोकसभा लढवली होती. मात्र, तेव्हा ते स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या तिकिटावर. तेव्हा त्यांना 3 लाख 40 हजार 871 मते मिळाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा विशाल पाटील लोकसभेच्या रिंगणात उतरले. काँग्रेस पक्षाबरोबरच सांगलीतही वसंतदादा पाटलांचा दरारा होता. त्यामुळं आता विशाल पाटील यांच्या विजयानंतर पुन्हा एकदा सांगलीत वसंतदादा घराण्यांचे वर्चस्व वाढू शकते.