`काही ठिकाणी उमेदवार बदलले असते तर...`, निकालाच्या 1 दिवस आधी असं का म्हणाले गिरीश महाजन?
Girish Mahajan Reaction: काही ठिकाणी उमेदवार बदलले असते तर चार-पाच जागा निश्चित वाढल्या असत्या असं माझं वैयक्तिक मत असल्याचे ते म्हणाले.
Girish Mahajan Reaction: निश्चितच निकाल लागल्यानंतर बारामती मध्ये अजित दादाच बाजी मारतील असा विश्वास भाजप नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. खूप कमी वेळ राहिला आहे. 16-17 तास बाकी आहेत. काय होईल ते उद्या कळेलच. महाराष्ट्रात महायुतीच्या बाजुने पॉझिटिव्ह निकाल लागतील असेही ते म्हणाले.
काही जागांवर उमेदवार बदलले असते. आम्ही तीनही मित्र पक्ष होतो. त्यामुळे काही ठिकाणी उमेदवार बदलले असते तर बरं झालं असतं, असे महाजन म्हणाले. त्या ठिकाणी असणाऱ्या कार्यकर्त्यांचेदेखील असं म्हणणं होतं, असे ते म्हणाले.
काही ठिकाणी उमेदवार बदलले असते तर चार-पाच जागा निश्चित वाढल्या असत्या असं माझं वैयक्तिक मत असल्याचे ते म्हणाले.
वेगवेगळ्या संस्थांचे वेगवेगळे एक्झिट पोल समोर आलेले आहेत. परंतु उद्या प्रत्यक्षात निकाल लागल्यावर नेमकी काय परिस्थिती ते आपल्याला कळेल. अनेक ठिकाणी वेगवेगळे निकाल दाखवत आहेत मात्र खरी परिस्थिती हे वेगळे आहे. मतदारांचा विश्वास हा पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप आणि महायुतीवर आहे. उद्याच्या वेळी निकाल लागेल त्यावेळेस मी दाव्याने सांगेल की 35 पेक्षा अधिक जागा ह्या महायुतीच्या निवडून येतील. अजून निकाल येणे बाकी आहे उद्या काहीही चमत्कार होऊ शकतो असेही ते म्हणाले.
आपण म्हणता मोदीजी 400 आकडा फार म्हणत होते. आपणच पाहिले तर 380 च्या जवळपास जागा दाखवत आहेत. त्यामुळे उद्या 400 पार जरी झाले तरी कोणालाही आश्चर्य वाटायला नको. लोकांनी ठरवलं आहे की पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करून देशाला सुपर पॉवर बनवायचंय. त्यामुळे उद्या निकाल लागल्यानंतरच आपल्याला याविषयी अधिक बोलता येईल असे ते म्हणाले.
उत्तर महाराष्ट्र मध्ये शंभर टक्के जागा या महायुतीच्या निवडून येतील एखादी जागा गेली तर गेली. पण मला असं वाटतं की सर्वात चांगला निकाल हा महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्राचा असेल. मला उत्तर महाराष्ट्राची 100% निकालाची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
एकनाथ खडसेंनी त्यांची भूमिका नेमकी काय आहे या संदर्भात आत्मचिंतन करण्याचे त्यांना गरज आहे. मी भाजप मध्ये आहे असं म्हणतात मी लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचे म्हणतात आणि भाजप वरच टीका करतात. एकनाथ खडसे त्यांची भूमिका स्पष्ट करावी त्यांनी आमची चिंता करू नये. स्वत:ची चिंता करावी, असा सल्ला महाजनांनी दिला.
पक्ष फोडीचा जागांवर परिणाम?
अजून निकाल लागले नाहीत ते 380 च्या वर चारशे पर्यंत महायुतीच्या जागा दाखवल्या जात आहेत. फोडाफोडी झाली म्हणून त्याचा परिणाम निकालावर झाला असं काही नाही. फोडाफोडी आम्ही केली नाही. शिवसेने मधून 50 लोक बाहेर पडले त्यात कोणाचा दोष आहे त्यात उद्धव ठाकरेंचा दोष आहे. पुत्र प्रेमात उद्धव ठाकरे आंधळे झाले आणि त्यामुळे हे सगळे लोक फुटले. शरद पवारांची देखील परिस्थिती तीच झाली मुलींच्या प्रेमात ते अंध झाले त्यांना मुलीलाच खुर्चीवर बसवायचं होतं. म्हणून 45 आमदार बाहेर पडले यात आमचा काय दोष आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला.
आम्ही कोणताही पक्ष फोडला नाही. त्यांच्या पक्षातील नेत्यांच्या कर्तुत्वामुळेच हे सर्व झालंय. त्यामुळे भाजपला दोष देऊन काही उपयोग नसल्याचे ते म्हणाले.