Uddhav Thackeray Group Slams PM Modi: "स्वतःला ईश्वराचा अवतार समजणाऱ्या नरेंद्र मोदी या व्यक्तीचा दारुण पराभव भारतीय जनतेने केला आहे," असं म्हणत ठाकरे गटाने 2024 च्या लोकसभा निकालावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे."(2024 चा निकाल) हा लोकशाहीने हुकूमशाही, झुंडशाहीवर मिळवलेला विजय असेच म्हणावे लागेल. नरेंद्र मोदी यांचा ‘चारशेपार’चा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला. लोक सार्वभौम आहेत. लोकशाहीचे संरक्षणकर्ते शेवटी लोकच असतात हे भारताने दाखवून दिले," असं ठाकरे गटाने 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.


जागा दाखवली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"चारशे जागा निवडून द्या. नव्हे, चारशे जागा निवडून आणणारच या अहंकारास शेवटी भारतीय जनतेने पायदळी तुडवले. खुद्द वाराणसीत नरेंद्र मोदी हे सुरुवातीस पिछाडीवर पडले तेव्हा देव जागा आहे हे दिसून आले. नरेंद्र मोदी व अमित शहा या जोडगोळीने भारत देशाचा तुरुंग केला होता. जनतेलाही मोकळेपणाने बोलण्याचे व वावरण्याचे स्वातंत्र्य नव्हते. विरोधात बोलणाऱ्यांना सरळ तुरुंगात टाकले गेले. दिल्ली, झारखंडच्या बहुमतातील मुख्यमंत्र्यांना सरळ तुरुंगात टाकणाऱ्या मोदी-शहांनी भारतीय जनता पक्षाचे ‘वॉशिंग’ मशीन केले. देशातील सर्व पक्षांतील भ्रष्ट नेत्यांना भाजपात आणून ‘आयेगा तो मोदी ही’ हा नारा देणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली," अशा कठोर शब्दांमध्ये ठाकरे गटाने या निकालावर भाष्य केलं आहे.


अहंकाराचा गाडा रोखण्याचे काम


"लोकसभा निवडणुकांचे निकाल हाच जनादेश आहे. या जनादेशाचा आदर नरेंद्र मोदी करणार आहेत काय? भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही हे पहिले सत्य व तथाकथित ‘एनडीए’च्या बहुमताचा आकडा काठावर आहे. म्हणजे ‘चारशे पार’च्या रथावर स्वार होऊ पाहणाऱ्या मोदी यांना टायर पंक्चर झालेल्या रिक्षात बसून रायसिना हिलवर फिरावे लागेल," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे. "देशाचे चित्र स्पष्ट झाले आहे. ज्या उत्तर प्रदेशात राममंदिराचे राजकारण करून मोदी स्वतःला हिंदूंचे नवे शंकराचार्य म्हणून प्रस्थापित करू पाहत होते त्या उत्तर प्रदेशात मोदी व भाजपास सगळ्यात मोठा हादरा बसला आहे. उत्तर प्रदेशातील 80 जागांपैकी 40 जागांवर समाजवादी पार्टी व काँग्रेसने आघाडी घेतली. अमेठीत स्मृती इराणी यांचा पराभव शेवटी राहुल गांधी यांच्या सामान्य कार्यकर्त्याने केला. रायबरेलीत राहुल गांधी स्वतः विजयी झाले. मोदी यांच्या अहंकाराचा गाडा रोखण्याचे काम शेवटी उत्तर प्रदेश व महाराष्ट्राने केले," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.