ठाकरे गटाचे 2 खासदार मोदींना पाठिंबा देणार; नरेश म्हस्केंचा मोठा दावा, `त्यांनी CM शिंदेंसोबत...`
Naresh Mhaske Big Claim: ठाकरे गटाचे (Thackeray Faction) 2 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पाठिंबा देणार आहेत असा दावा शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केला आहे.
Naresh Mhaske Big Claim: ठाकरे गटाचे (Thackeray Faction) 2 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पाठिंबा देणार आहेत असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी घेतलेली भूमिका पटत नसल्याने खासदार वेगळी भूमिका घेणार असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. विशेष म्हणजे दुसरीकडे संजय राऊत यांनी झी 24 तासच्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत शिंदे गटातील अनेक आमदार, खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.
नरेश म्हस्केंचा दावा काय?
"नवनिर्वाचित 2 खासदारांनी संपर्क साधलेला आहे. त्यांना उद्धव ठाकरेंनी घेतलेली भूमिका पटत नाही. आपल्या मतदारसंघात विकासकामं व्हायला हवीत, तसंच शिवसेनेच्या मूळ तत्वापासून जे बाजूला गेले आहेत, मशिदी, प्रार्थनास्थळं येथून देण्यात आलेले आदेश त्यांना पटलेले नाहीत. भविष्याच्या दृष्टीने शिवसेना आणि शिवसेनेची तत्वं यासाठी 2 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला आहे".
यावेळी ते म्हणाले की, ज्या शिवसैनिकांनी त्यांना मतदान केलं आहे त्यांना त्याचा पश्चाताप होत आहे. अनेक शिवसैनिक पुन्हा येण्यासाठी आमच्याशी संवाद साधत आहेत. एकनाथ शिंदे यासंबंधी निर्णय घेणार आहेत. ठाकरे गटाच्या 2 खासदारांनी आमच्याशी संपर्क केला आहे. त्यांना नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायचा आहे. अपात्रतेचा विषय असल्यामुळे ते थांबले आहेत. मात्र 6 लोक जमवून ते पुन्हा आमच्यासोबत येणार आहेत. हे काल रात्री दिल्लीत घडलं".
पुढील निवडणुकीत उलट चित्र दिसेल. आम्हाला दबावतंत्राचा वापर करण्याची गरज नाही. मतदार आमच्यासोबत नसते तर आम्ही एवढ्या मतांनी निवडून आलो असतो का? अशी विचारणाही त्यांनी केली.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले आहेत?
"आमदारच नाही तर अनेक खासदारही आमच्या संपर्कात आहेत असं तुम्हाला सांगितलं तर धक्का बसेल," असं संजय राऊत म्हणाले. यावर आता निवडून गेलेले खासदार आहेत का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले, "हो आहेत ना, तुम्हाला धक्का बसेल. तुम्ही विश्वास ठेवणार नाही. मी नावं कशासाठी सांगू. आमच्या, त्यांच्या पक्षात काही निर्णय होऊ द्या. हा धोरणात्मक निर्णय असतो. महाराष्ट्राचं राजकीय चित्र बदलत आहे. मोदींचं सरकार हे आळवावरंच पाणी आहे हे सर्वांनाच माहिती आहे," अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.