Maharashtra News Today:   सातबारा उताऱ्यावर आता आईचे नाव देखील लावण्यात येणार आहे, महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला आहे. 1 नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव लिहिणे बंधनकारक केल्यानंतर आता हा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 1 मे 2024नंतर जन्मलेल्यांना जमीन खरेदी करताना सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणे बंधनकारक असणार आहे. भूमी अभिलेख विभागानं हा निर्णय घेतला आहे. 


काय आहे हा निर्णय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भूमी अभिलेख विभागाच्या प्रस्तावानुसार, महाराष्ट्रात 1 मे 2024 नंतर ज्यांचा जन्म झाला असेल त्यांच्या नावावर जमीन खरेदी करताना संबंधिताच्या आईचे नाव सातबाऱ्यावर नोंदवणं बंधनकारक आहे. मात्र यावेळी वडिलांचे नाव सातबारा उताऱ्यावर नोंदवणे बंधनकारक नसेल. 


फेरफारानंतरही आईचे नाव नोंदवले जाणार


जमीन व्यवहारात पुढील काळात फेरफार करण्यात आल्यास त्यावरदेखील आईचं नाव लावलं जाणार आहे. तर विवाहितांना वडिलाचं किंवा पत्नीचं नाव लावण्याची मुभा दिली जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 नोव्हेंबरपासून करण्यात येण्याची शक्यता आहे. भूमी अभिलेख विभागाने सरकारकडे हा प्रस्ताव पाठवला आहे. त्यानंतर यातील त्रुटीला अभ्यास करत त्यावरुन उपाययोजना करण्यात येतील. नंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 


स्त्रियांसाठी योजना


महाराष्ट्रात स्त्रियांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. महिलांना स्टॅम्प ड्युटीमध्येही सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर, घराच्या मालकीत महिलांच्या नावांची नोंद करुन पती-पत्नी संयुक्त मालक असावेत, यासाठी महाराष्ट्रात मोहिमही राबवली जात आहे. त्याचबरोबर, सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावचा समावेश करणं राज्य सरकारने बंधनकारक केले आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्रात एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांना तिकिटांवर 50 टक्के सवलत दिली जाते. म्हणजेच महिलांना अर्धा तिकिटांचेच पैसे द्यावे लागतात.