पाऊस पडणार की नाही? Monsoon बाबत मोठी अपडेट
Maharashtra Mansoon Update : अद्यापही मान्सूनने (Monsoon Update) दडी मारली आहे. पण मान्सून पुढे जाण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. आजपासून मान्सून पुन्हा सक्रीय होईल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
Maharashtra Mansoon Update : जून महिना संपत आली तरी पाऊस गायब आहे. राज्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. अद्यापही मान्सूनने (Monsoon Update) दडी मारली आहे. पण आजपासून मान्सून पुन्हा सक्रीय होईल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, आज पहाटे नवी मुंबईत (Navi Mumbai Rain) दहा मिनिटे पाऊस झाला. आतापासून पुढील दोन दिवस पावसासाठी अनुकल वातावरण आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Rain Alert)
मान्सून पुढे जाण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. तो पुढे सरकण्यासाठी कमी दाबाचे पट्टे तयार होण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, आज आणि उद्या कोकण, विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मान्सूनचे वारे पुढे जाण्यासाठी कमी दाबाचे पट्टे तयार होणे गरजेचे असते. ते आता तयार होऊ लागले असून वार्याचा वेगही वाढला आहे. अरबी समुद्रासह लक्षद्वीप, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार झाले. त्यामुळे वार्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी इतका झाला आहे. मान्सून सध्या रायचूर या भागात आहे. त्याने दक्षिण भारतासह ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश या भागात प्रगती केली.
अमरावतीला झोडपले, जिल्हा रुग्णालयाचा तलाव
राज्यात मान्सून वाऱ्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात उद्यापासून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. आज पहाटे नवी मुंबईत पावसाची जोरदार सर आली. सध्या मुंबईत ढगाळ वातावरण आहे. तर विदर्भातील अमरावती जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शहरातील नालेसफाईची पोलखोल केली. पहिल्याच पावसात अमरावती जिल्हा रुग्णालयाच्या आवाराला तलावाचं स्वरुप आले होते. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमरोच पाणी साचल्याने रुग्णांना या पाण्यातून वाट काढावी लागली. पाण्यातून वाट काढणे अशक्य होत असल्याने काही रुग्ण चक्क सायकल रिक्षा घेऊनच रुग्णालयात शिरले. पावसाळा तोंडावर असतांना पालिका आणि रुग्णालय प्रशासनाने पाण्याचा निचरा करण्याची सोय का केली नाही असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
मुंबई तापली, सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद
दरम्यान, मान्सून गायब असल्याने मुंबईचा पारा चांगलाच वाढला आहे. मुंबईत सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदविण्यात आले आहे. जूनमध्येही मेसारखा उकाडा जूनचा शेवटचा आठवडा सुरू झाला तरी अद्याप मे महिन्यासारखा उष्मा कायम आहे. गुरुवारी ही जाणीव अधिक तीव्र झाली. भारतीय हवामान विभागाकडून सातत्याने मान्सूनला चालना मिळाल्याचे सांगण्यात येत असताना मुंबईत पावसाचा शिडकावाही होत नाही.मुंबईत गुरुवारी कुलाबा येथे 34.4 तर सांताक्रूझ येथे 34.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान दोन्ही केंद्रांवर सरासरीपेक्षा तीन अंशांनी अधिक आहे. गुरुवारचे तापमान 35 अंशांच्या पार नसूनही उकाड्याची जाणीव अधिक होती. दिवसभरात पश्चिमेकडून वारे वाहत होते. संध्याकाळच्या सुमारास आर्द्रता मात्र कमी होती. कुलाबा येथे 63 तर सांताक्रूझ येथे 59 टक्के आर्द्रतेची नोंद झाली. त्यामुळे आर्द्रतेमुळे उकाड्यात वाढ झाली नसल्याचे समोर आले.