राज्यात कोरोनाचे ९४३१ रुग्ण वाढले, २६७ जणांचा मृत्यू
कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा ९ हजारांपेक्षा जास्तने वाढली
मुंबई : मागच्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनाच्या ९,४३१ रुग्णांची वाढ झाली आहे, तर २६७ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातला कोरोनाग्रस्तांचा आकडा ३,७५,७९९ एवढा झाला आहे, यापैकी १,४८,६०१ रुग्ण हे ऍक्टिव्ह आहेत, तर २,१३,२३८ रुग्ण हे पूर्णपणे बरे झाले आहेत. आजच्या एका दिवसात ६,०४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे व्हायचं प्रमाण ५६.७४ टक्के एवढं झालं आहे.
महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत १३,६५६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातल्या २६७ मृत्यूंची नोंद आज झाली आहे. सध्या राज्यातला मृत्यूदर हा ३.६३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात १८,८६,२९६ कोरोना टेस्ट करण्यात आल्या, यापैकी ३,७५,७९९ टेस्ट (१९.९२ टक्के) या पॉझिटिव्ह आल्या.
महाराष्ट्रामध्ये आजही सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात सापडले आहेत. २४ तासांमध्ये पुणे मनपा क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या १,९२१ ने वाढली आहे, यामुळे पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५१,२९१ एवढी झाली आहे. पुण्यात एका दिवसात २८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यामुळे पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १,२७६ एवढी झाली आहे.
दुसरीकडे मुंबईमध्ये दिवसभरात कोरोनाचे १,१०१ रुग्ण वाढले आहेत, यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या १,०९,१६१ एवढी झाली आहे. मुंबईमध्ये आजच्या एका दिवसात ५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ६,०९३ एवढा झाला आहे.