मुंबई : राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १ लाखाच्या वर गेली आहे. आजच्या एकाच दिवशी कोरोनाच्या ८,०१८ रुग्णांना बरे होऊन घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे आता बरे झालेल्यांची संख्या १ लाख १ हजार १७२ झाली आहे. आजच्या एका दिवसात मुंबईमधून सर्वाधिक ७०३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पाठोपाठ पुणे मंडळात ४७७ (आतापर्यंत एकूण १४ हजार ३१५), नाशिक मंडळात ३३२ (आतापर्यंत एकूण ५६०२), औरंगाबाद मंडळ ९३ (आतापर्यंत एकूण ३२१४), कोल्हापूर मंडळ १२ (आतापर्यंत एकूण १५५६), लातूर मंडळ ७ (आतापर्यंत एकूण ७०२), अकोला मंडळ ३१ (आतापर्यंत एकूण १९६४), नागपूर मंडळ ३३ (आतापर्यंत एकूण १५३४) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.


२९ मे रोजी राज्यात एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा तेवढ्याच विक्रमी संख्येन रुग्ण बरे झाले आहेत.


१५ जूनला एकाच दिवशी ५०७१, २४ जूनला ४१६१ आणि  २५ जूनला ३६६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जूनमध्ये एकाच महिन्यात १२ हजार ८९३ एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले.


गेल्या काही महिन्यापासून सातत्याने राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ५१ ते ५३ टक्क्यांच्या आसपास राहीला आहे. राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टीव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.