अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर हत्येचा भीषण थरार घडला. एका मनोरुग्णाने (Psychopath) केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण रुग्णालयात मृ्त्यूशी झुंज देत आहेत. नागपूरच्या रेल्वे स्थानकावरील (Nagpur Railway Station) फलाट क्रमांक सातवर ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने गर्दीच्या वेळी स्थानकावर एकच खळबळ उडाली. आरोपी हल्ला करुन पळत असताना रेल्वे कर्मचाऱअयांनी रेल्वे रुळावर आरोपीचा पाठलाग करुन त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय घडलं नेमकं?
नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सातवर ऐन गर्दीच्यावेळी एक मनोरुग्ण हातात लाकडी राफटर घेऊन स्थानकावर उभ्या असलेल्या लोकांवर हल्ला करत सुटला. रेल्वे रुळाच्या कामासाठी वापरात येणाऱ्या लाकडी राफ्टरने लोकांवर तो हल्ले करत होता. अचानक घडलेल्या या घटनेने स्थानकावर एकच खळबळ उडाली. लोकं सैरावैरा पळू लागली. आरोपीने चार लोकांवर हल्ला केला. यात अतिरक्तस्त्रावामुळे दोघांचा मृत्यू झाला. तर दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. 


हल्ला केल्यानंतर आरोपी रेल्वे रुळावरुन पळू लागला. त्याचवेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत आरोपीचा पाठलाग करुन त्याला पकडलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयराम केवट असं आरोपीचं नाव असून तो 35 वर्षांचा आहे. आरोपी मनोरुग्ण असल्याची माहिती मिळतेय. याबाबत नागपूर लोहमार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत. 


तामिळनाडूच्या प्रवाशाचा मृत्यू
आरोपी जयराम केवट याने केलेल्या हल्ल्यात तामिळनाडूतल्या एका प्रवाशाचा मृत्यू झाला. गणेश कुमार डी असं या मृत प्रवाशाचं नाव असून त्यांचं वय 54 होतं, असं पोलिसांनी सांगितलं. मृत गणेश कुमार हे तामिळनाडूतल्या दिंडीगुल इथे राहाणारे आहेत.  काही कामानिमित्ताने ते नागपूरमध्ये आले होते. पण आरोपीच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी तामिळनाडूत त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे.