Eknath Shinde Health Update: महायुतीच्या शपथविधीची तयारी सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी पडले. त्यांच्या आजारपणामुळं महायुतीच्या बैठकाही होऊ शकल्या नाही. विरोधकांनी या आजारावर संशय घेतलाय. सत्ताधारी मात्र आपसांत कोणतेही रुसवे फुगवे नसल्याचं सांगतायेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्याच्या घरातून थेट हॉस्पिटल गाठलं आणि तिथून ते मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी रवाना झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आझाद मैदानावर शपथ घेणार आहेत. या शपथविधीला अवघे 48 तास शिल्लक असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आजारपणानं डोकं वर काढलंय. निवडणूक काळात आजारी असलेल्या एकनाथ शिंदे शुक्रवारी संध्याकाळी आराम करण्यासाठी दरे या मूळगावी गेले. एकनाथ शिंदेंना दरे गावात आराम मिळण्याऐवजी तिथं त्यांना ताप आला. तिथंही डॉक्टरांनी त्यांना तपासलं उपचार केले. रविवारी दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री ठाण्यात परतले. ठाण्यातल्या घरी त्यांच्यावर उपचार सुरु असतानाही प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. एकनाथ शिंदेंच्या आजारपणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शंका घेतली. 


एकनाथ शिंदेंच्या आजारपणावर शंका घेणाऱ्या विरोधकांवर शिवसेनेनं पलटवार केलाय.दुपारच्या सुमारास एकनाथ शिंदेंनी तपासण्यांसाठी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल गाठलं. तिथं त्यांच्या काही चाचण्या झाल्या. डॉक्टरांनी त्यांना तपासलं.हॉस्पिटलमध्ये तपासणी झाल्यानंतर काही वेळानं एकनाथ शिंदे रुग्णालयाबाहेर पडले. आपली प्रकृती ठिक असल्याची ग्वाही त्यांनी दिली.


एकनाथ शिंदेंच्या आजारपणामुळं महायुतीचे नेते काळजीत पडले होते. एकनाथ शिंदेंनी काही तपासण्यांनंतर मुंबईतील शासकीय निवासस्थान वर्षा गाठलं. त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीला आराम पडावा आणि शपथविधीला ते नेहमीच्या उत्साहात हजर व्हावेत अशी अपेक्षा महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जातेय.


मुख्यमंत्रिपदाची शपथ कोण घेणार? 


आझाद मैदानावर महाशपथविधीची जोरदार तयारी  सुरू आहे. शपथविधीचा ग्रँड सोहळा यशस्वी करण्यासाठी भाजप नेत्यांकडून आढावा बैठका घेण्यात येत आहे.  सोमवारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे नेते आझाद मैदानावर तयारीची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. शिवसेनेचे नेते नाराज असल्याची चर्चाही रंगली होती. कालच्या नाराजीनंतर महायुतीची एकजुट दाखवण्याकरता भाजप आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्र पाहणी केली. भाजपकडून गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेनेकडून गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट यांनी आझाद मैदानाची पाहणी करत आढावा घेतला.  महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं यावेळी या नेत्यांनी स्पष्ट केलं.शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक असताना अजूनही महत्त्वाची खाती, मुख्यमंत्रिपद आणि कोणाला किती मंत्रिपदे द्यायची? यावरून महायुतीत एकमत झालेलं दिसून येत नाही.  त्यातच महायुतीतील तिन्ही पक्षातील नेत्यांनी आझाद मैदानाची पाहणी केली. त्यामुळे आता पाच डिसेंबर रोजी आझाद मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ कोण घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.