Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरात दंगलीप्रकरणी 7 जणांना अटक, 3 कोटींचे नुकसान
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी रात्री दंगल केल्याप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. तर चार संशयित आरोपींसह सुमारे 400 ते 500 अज्ञातांविरोधात 18 कलमांअंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आहेत.
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी रात्री दंगल केल्याप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. तर चार संशयित आरोपींसह सुमारे 400 ते 500 अज्ञातांविरोधात 18 कलमांअंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आहेत. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत संशयितांची धरपकड सुरु केली होती. सगळ्याच आरोपींचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे. समाजकंटकांनी एकूण 18 गाड्या जाळल्यात. यात पोलिसांच्या 15 तर खासगी 3 गाड्यांचा समावेश आहे. जाळपोळीत 3 कोटींचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर दगडफेकीत 16 पोलीस जखमी झालेत.
'झी 24 तास'ची महत्त्वाची भूमिका
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात दोन गटांत झालेल्या दंगलीनंतर आता येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. शहरामध्ये पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला असून संभाजीनगराला छावणीचं स्वरूप आलं आहे. दरम्यान राज्यातील शांतता आणि सलोखा कायम रहावा या उद्देशाने या दंगलीमधील व्हिडिओंचं प्रक्षेपण न करण्याचा निर्णय 'झी 24 तास'ने घेतला आहे. जाळपोळ आणि तोडफोडीचे सर्व व्हिडिओ 'झी 24 तास'कडे उपलब्ध आहेत. मात्र रामनवमी उत्सवाच्या दिवशी आणि रमझानचा महिना असल्यानं राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडू नये. तसेच महाराष्ट्रातील सामाजिक स्वास्थ्यही खराब होऊ नये यासाठी एक जबाबदार न्यूज चॅनल म्हणून याबाबत वृत्त दाखवत नाही.
दोन गटातील किरकोळ वादातून दंगल
राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटातील किरकोळ वादातून दंगल उसळली. यात 15 पोलीस जखमी झाले आणि अनेक वाहने जाळण्यात आली आहेत. या दंगलीमुळे भाजप राज्यात जातीय दंगली भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडातील विरोधकांनी केला आहे. दरम्यान, दंगलीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. तसेच यातील दंगखोरांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ही दंगल दुर्दैवी असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. दंगलीचे कारण अस्पष्ट आहे आणि काही जणांनी भडकाऊ भाषण दिल्याचा दावा केला आहे तर पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलेय, किराडपुरा शहरातील काही दुचाकीस्वार तरुणांत किरकोळ भांडण झाले. त्यांच्यातील वाद टोकाला गेल्यानंतर दंगा उसळला. दरम्यान, शेकडोच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केला, मालमत्तेची तोडफोड केली आणि पोलिसांच्या मालकीची वाहने जाळली. त्यानंतर आणखी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आली. यात 15 पोलीस जखमी झालेत.