दुष्काळ, सततच्या नापिकीने वैतागला, कर्जबाजारी शेतकरी गुन्हेगारीकडे वळला
मला अनेकांचं कर्ज चुकवायचं आहे, मला पैसे दे नाहीतर... शेतकऱ्याने दिली धमकी
जयेश जगड, झी मीडिया, अकोला : ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, सततची नापिकी अशा अनेक समस्यांनी राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकरी कर्जाच्या चक्रव्युहात अडकत चालला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचा प्रश्न सुटण्याऐवजी गुंतागुंतीचा होत जातो आणि शेवटी शेतकऱ्यांकडे पर्याय उरतो तो आत्महत्त्येचा.
अकोल्यात अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दुष्काळ आणि सततची नापिकी यामुळे कर्जबाजारी झालेल्या एका शेतकऱ्याने आत्महत्येचा मार्ग न स्विकारता चक्क गुन्हेगारीचा मार्ग निवडला.
नेमकी काय आहे घटना?
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीत अशोक गोठवाल यांचे हळदीचे प्रतिष्ठान आहे. गोठवाल हे नामांकित हळद व्यापारी असल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी इथं हळद विक्रीसाठी येतात. सोमवारी सकाळी गोठवाल यांनी आपलं दुकान उघडताच त्यांना त्यांच्या दुकानाच्या शटर जवळ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये एक पत्र मिळालं.
खंडणीसाठी धमकीचं पत्र
या पत्रात त्यांना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. खंडणीखोराने तब्बल पाच लाख रुपयांची मागणी केली होती. विशेष म्हणजे खंडणी मागणाऱ्या व्यक्तीने या पत्रात स्वत:ची व्यथा सुद्धा मांडली होती. माझ्यावर मोठं कर्ज असून मला अनेकांचे पैसे द्यायचे आहेत, त्यामुळे मला पैसे द्या. पैसे न दिल्यास तुम्हाला आणि तुमच्या मुलाला जीवे मारेन आणि नंतर स्वत:ही आत्महत्या करणार असं नमूद करण्यात आलं होतं. इतकंच नाही तर तुम्ही मला पाच दिल्यास तुम्हाला काही फरक पडणार नाही, तुमच्याजवळ खूप पैसा आहे असंही या पत्रात लिहिण्यात आलं होतं.
पोलिसांनी रचला सापळा
खंडणीसाठी धमकीचं पत्र मिळताच अशोक गोठवाल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. खंडणी मागणाऱ्या व्यक्तीने गोठवाल यांना अकोट-लोहारी रस्त्यावरील MIDC इथल्या प्रधानमंत्री सडक योजनेच्या बोर्डाजवळ पैशांची बॅग ठेवण्यासाठी सांगितलं. अकोला पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. तब्बल दीड तासानंतर आरोपी हा पैशाची बॅग घेण्यासाठी आला असता पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खंडणी मागणारा हा आशिष नामक व्यक्ती शेतकरी आहे. अनेक वेळा तो अशोक गोठवाल यांच्याकडे हळद विक्रीसाठी घेऊन येत असायचा.अकोट पोलिसांनी आशिषविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल केले असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.