भूकंपाच्या धक्क्यांनी हिंगोली, परभणी हारदरलं; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Hingoli Earthquake : हिंगोली आणि आसपासच्या परिसरात पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दोन भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकत भयभीत झाले होते.
गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : राज्याच्या हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले आहेत. गुरुवारी सकाळी हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे दोन धक्के जाणवले आहेत. सकाळी सहा ते व सव्वा सहाच्या दरम्यान काही गावांमध्ये भूगर्भातुन आवाज येऊन सौम्य धक्के जाणवले आहेत.
या भुकंपाच्या धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात 4.5 व 3.6 अशी झाली असून कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव परिसरात एक भिंत कोसळलयाचा दावा केला जात आहेत. या सगळ्या प्रकारानंतर सकाळच्या सुमारास नागरिक घाबरून घराबाहेर पडले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात गेल्या पाच वर्षापासून कमी अधिक प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवत आहे. हिंगोलीत काही वेळा भूगर्भातून आवाज होत असल्याचे प्रकार प्रामुख्याने कळमनुरी वसमत तालुक्यातील काही गावात जाणवत होते. भूकंपाचे केंद्रबिंदू आखाडा बाळापूर पासून पंधरा किमी असल्याचे सांगितले जात आहे. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गाव आणि परिसरात नेहमीच जमिनीत गूढ आवाज येत असतात. मात्र यावेळी भूकंपाची तीव्रता काही प्रमाणात जास्त होती.
नांदेडमध्येही जाणवले भूकंपाचे धक्के, नागरिक पडले घराबाहेर
नांदेड जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी 6 वाजून 8 मिनिटे आणि 6 वाजून 19 मिनिटांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक भयभीत होउन घरा बाहेर पडले होते. नांदेड जिल्ह्यातल्या आणेक तालुक्यात नागरिकांना भूकंपाचा धक्का जाणवला. हदगाव, अर्धापूर , भोकर , नायगाव, मुखेडसह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर पासून 15 किलो मीटरवर होता. पहिल्या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल तर दुसऱ्या भूकंपाची तीव्रता 3.6 रिष्टर स्केल असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी याची माहिती दिली. दरम्यान, या धक्क्यामुळे जिल्ह्यात कुठेही नुकसान झाले नाही.