महाराष्ट्र तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर? `या` जिल्ह्यात कोरोनाबाधित मुलांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन सक्षम असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे
सोलापूर : राज्यात कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरत आहे. पण कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असून तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने विविध पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. राज्य सरकारने बालरोगतज्ज्ञांचा टास्कफोर्स बनवण्याचा निर्णय घेतलाय.
पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरीक, दुसऱ्या लाटेत युवावर्ग त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्ग जास्त पसरू शकतो, अशी सूचना तज्ज्ञांनी सरकारला केली होती. त्यामुळे राज्य सरकारने आधीच तयारी सुरू केली आहे.
पण त्याआधीच महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातून चिंताजनक बातमी समोर आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतच मुलांमध्ये कोरोना होण्याचं प्रमाण वाढू लागल्याचं प्रकर्षांने दिसून आलं आहे. सोलापूर जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत 613 मुले करोनाबाधित झाल्याची माहिती समोर आहे. हा आकडा चिंता वाढवणार आहे.
सोलापूर जिल्ह्य़ात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत 18 वर्षांखालील सुमारे 12 हजार मुलांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली. पण गेल्या काही दिवसात हे प्रमाण लक्षणीय वाढलं आहे. गेल्या दहा दिवसांत तब्बल 613 मुलं कोरोनाबाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेषत: जिल्हा ग्रामीणमध्ये बाधित मुलांचं प्रमाण जास्त आहे.
मात्र, असं असलं तरी देखील जिल्हा प्रशासन या परिस्थितीशी सामना करायला सक्षम असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव यांनी सांगितलं आहे.