आजच्या जगात जमिनीवरुन सर्रास वाद होत असल्याचं आपण पाहिलं असेल. भाऊ-बहिण, कुटुंबिय शेजारी यांच्यात जमिनीवरुन मोठ्या प्रमाणात वाद झाल्याचेही तु्म्ही वाचलं असेल. पण महाराष्ट्रातील उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील एका गावातील प्रकरण उत्सुकता वाढवणारं आहे. उस्मानाबादच्या एका गावातील 32 एकर जमीन माकडांच्या (Monkey) नावावर करण्यात आलीय. या गावात माकडांबद्दल (Monkey) इतका आदर आहे की लग्नसमारंभात वऱ्हाडींच्या आधी माकडांना जेवण दिलं जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातील उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील उपला हे गाव माकडांच्या आदरातिथ्यामुळे खूप चर्चेत आहे. उपला गावातील लोक माकडांना विशेष मान देतात. ते त्यांच्या दारात आल्यावर त्यांना अन्नदान करतात आणि काही वेळा विवाह सोहळा सुरू करण्यापूर्वी त्यांचा सन्मान केला जातो. उपळा ग्रामपंचायतीमध्ये जमिनीच्या नोंदीनुसार गावात राहणाऱ्या सर्व माकडांच्या नावावर 32 एकर जमीन आहे. गावचे सरपंच बप्पा पडवळ यांनी पीटीआयला सांगितले की, "जमिनी माकडांच्या मालकीची असल्याचे कागदपत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय पण या प्राण्यांसाठी ही तरतूद कोणी केली आणि कधी केली हे माहीत नाही."


पडवळ यांनी सांगितले की, पूर्वी गावात केल्या जाणाऱ्या सर्व विधींमध्ये माकडांची उपस्थिती होती. गावात आता जवळपास 100 माकडे आहेत आणि हे प्राणी एकाच ठिकाणी जास्त काळ थांबत नसल्याने त्यांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी होत आहे. त्या जमिनीवर वनविभागाने वृक्षारोपण केले आहे. याआधी त्या जागेवर घर होते, ते आता कोसळले असल्याचे त्यांनी सांगितले.