मिलिंद, झी मीडिया, वर्धा :  कोरोना व्हायरसचा प्रकोप महाराष्ट्रात सुरू आहे, अनेक जिल्हे सील करण्यात आले आहेत. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी नसल्याने लग्न कसं करायचं यावर वधू आणि वर पक्षाला प्रश्न पडला. अशावेळी खाकी कपड्यातील पोलिसांनी यातून मार्ग काढत पोलीस चौकीजवळच हे लग्न लावलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात राहणारे विठ्ठल आहाके यांचं लग्न ६ मे रोजी वर्धा जिल्ह्यातील अशोकराव मरसकोल्हे यांची मुलगी प्रवीणासोबत योजिले होते. या लग्नाला परवानगी मिळावी म्हणून दोन्ही पक्षाने पोलीस प्रशासनाकडे खूप प्रयत्न केले, पण यश आलं नाही.


शेवटी नवरदेवाने ठरवलं काहीही झालं तरी ६ मे रोजी सासऱ्याच्या गावी जावून लग्नाचा बार उडवून द्यायचा. पण नवरदेवाला दोन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरवर पोलिसांनी रोखलं. तेव्हा नवरदेवाने आपली व्यथा सांगितली, हळदी अंगाला लावून झाली आहे, आज लग्नाचा मुहूर्त आहे, तो देखील टळू शकतो.


पोलिसांनी यावर सुवर्ण मध्य साधला,  मुलगी आणि तिच्या आईला तिथे बोलवलं, यानंतर नवरदेव-नवरीचे आईवडीलही आले, लग्नासाठी झाडाचा मंडप झाला, पोलिसांच्या खुर्च्या नवरदेव नवरीसाठी आसनं झाली आणि नवरदेव नवरीचे मामा आलेच नव्हते, म्हणून पोलिसांनी नवरदेव-नवरीच्या मामांची भूमिका पार पाडली.


ब्राह्मणाने सर्व विधी पार पाडले. पोलिसांनी आपली ड्युटी देखील केली आणि नवरदेव-नवरीचं लग्नही ठरल्याप्रमाणे पार पाडलं.